मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्यावर केलेल्या ऐतिहासिक सत्याग्रहाला पुढील वर्षी २० मार्च २०२७ रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या महाड क्रांती शताब्दी वर्षाच्या प्रारंभाचा कार्यक्रम मुंबई मराठी पत्रकार संघ आणि समान संधी अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम सायंकाळी ५ ते ९ या वेळेत होणार असून त्याचे अध्यक्षस्थान जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) दिल्लीचे अधिष्ठाता डॉ. विवेक कुमार भूषविणार आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण हे स्वागताध्यक्ष असतील.
कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते किरण माने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच दैनिक ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विवेक गिरधारी आणि मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. सुंदर राजदीप हे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत.
या प्रसंगी समान संधी अभियानचे अध्यक्ष सुनील कदम महाड चवदार तळे क्रांती शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यव्यापी कार्यक्रमांची माहिती देणार आहेत.
महाडच्या चवदार तळ्यावर १९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाची तुलना जगातील लोकशाहीची जननी मानल्या जाणाऱ्या फ्रेंच राज्यक्रांतीशी केली जाते. त्यामुळे या शताब्दी महोत्सवाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
महाड क्रांती शताब्दी वर्षानिमित्त मानवी अधिकार, सामाजिक समता आणि लोकशाही मूल्यांचा जागर राज्यभर करण्यात येणार आहे. तसेच उपेक्षित आणि वंचित समाजघटकांच्या उत्कर्षासाठी राज्यव्यापी कृती कार्यक्रम राबविण्याचा मानस असल्याची माहिती समान संधी अभियानचे अध्यक्ष सुनील कदम यांनी पत्रकाद्वारे दिली.

