महाड – महाड औद्योगिक वसाहतीतील रोहन केमिकल्स या कंपनीवर महाड एमआयडीसी पोलिस आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) यांच्या संयुक्त कारवाईतून तब्बल ₹88.92 कोटी किंमतीचा केटामाईन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने संपूर्ण औद्योगिक वसाहतीत खळबळ उडाली असून अजूनही काही कंपन्या तपासाच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एमआयडीसीमधील प्लॉट नंबर E-26/3 या ठिकाणी रोहन केमिकल्स कंपनी कार्यरत होती. कंपनीच्या परिसरात सुरू असलेल्या संशयास्पद रसायन प्रक्रियेवर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात ३४ किलो केटामाईन पावडर आणि १३ किलो लिक्विड केटामाईन असा एकूण साठा जप्त करण्यात आला.
प्राथमिक तपासात, या कंपनीत कायदेशीर उत्पादनाऐवजी अमली पदार्थ निर्मिती सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बेकायदेशीर व्यवहारामागे अनेक व्यक्ती आणि लहान रासायनिक युनिट्स सामील असल्याचा पोलिसांना संशय आहे.
या प्रकरणात खालील चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे: मच्छिंद्र भोसले (रा. जिते, ता. महाड), सुशांत पाटील (रा. मोहप्रे, ता. महाड), शुभम सुतार (रा. पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर), रोहन गवस (रा. ५०१, मार्बल आर्च, मित्तल कॉलेज जवळ, चिंचोली बंदर, मालाड वेस्ट, मुंबई)
या प्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा 1985 (NDPS Act) अंतर्गत कलम ८(क), २२(क), २५, २७(अ), २९ आणि BNS 2023 अंतर्गत कलम ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी संबंधित पथकाचे अभिनंदन केले आहे. या माहितीची नोंद पोलीस नाईक इकबाल चांद का शेख यांनी महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात केली आहे. कारवाईचे नेतृत्व रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांनी केले.
या कारवाईत खालील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते: महाड शहर पोलीस ठाणे, महाड एमआयडीसी ठाणे, कोल्हापूर पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक जीवन माने, संतोष जाधव, आनंद रावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शफी गोरेगावकर, खाडे, पोलीस हवालदार, नाईक व शिपाई – गायकवाड, बोटे, दराडे, दरेकर, कांबळे, सोंडगीर, कदम, संपते, आंधळे, चिले, कांजर, कोळी, बिरादार, भोईर, कारकुंड, गुरव, पहेलकर, सोंडकर इ.
या कारवाईमुळे महाड औद्योगिक वसाहतीतील बेकायदेशीर अमली पदार्थ उत्पादनाच्या साखळीला मोठा धक्का बसला आहे. मात्र, काही बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये रात्रीच्या सुमारास अशाच प्रकारे बेकायदेशीर पदार्थ निर्मिती सुरू असल्याच्या चर्चा कामगारांमध्ये होत असून, संपूर्ण नेटवर्कचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.