महाड: महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान सुशांत झांबरे यांच्या कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील वरिष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी महाड शहरातील वाढत्या दंडेलशाहीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दरेकर म्हणाले, “आज मतदान सुरू असताना झांबरे यांच्या कार्यकर्त्यावर भ्याड हल्ला झाला. मी जाहीर सभांत वारंवार सांगितलं आहे की महाडला दंडेलशाही आणि दहशतीपासून वाचवायचं असेल तर सुशांत विचाराची माणसं निवडून आली पाहिजेत. निवडणूक संपण्याआधीच माझं वक्तव्य किती खरं आहे हे आज सिद्ध झालं.”
ते पुढे म्हणाले, “महाड ही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक, सांस्कृतिक वारसा असलेली पवित्र भूमी आहे. अशा भूमीत गुंडगिरी, दहशत आणि दंडेलशाहीला जागा नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाडच्या सुसंस्कृत परंपरेचा उल्लेख केला आहे. या शहराच्या स्वभावाला अशा प्रवृत्ती शोभत नाहीत.”
नागरिकांना आवाहन करत दरेकर म्हणाले, “महाडमधील व्यापारी आणि नागरिक अनेक वर्षे शोषणाला सामोरं गेले आहेत. आता निवडणुकीत उरलेल्या क्षणांमध्ये ही दंडेलशाही मोडून काढण्याची जबाबदारी मतदारांनी पार पाडावी. राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी अशा दहशतीला कधीच घाबरणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “आज लोकशाहीचा उत्सव आहे. मला विश्वास आहे की महाडची जनता या मतदानाच्या माध्यमातून दंडेलशाहीला पूर्णविराम देत भारतीय जनता पार्टी–राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजय देईल.”

