महाड : महाड तालुक्यातील नांगलवाडी येथे जुन्या वादातून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याने एका आरोपीला अटक केली आहे.
नांगलवाडी येथील शुभ लाभ सोसायटी परिसरात बुधवार, ८ एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. नारायण रामचंद्र साळुंखे (रा. शिवथर, ता. महाड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पिण्याच्या पाण्याच्या जुन्या वादातून हा हल्ला झाला आहे.
संभाजी दिगंबर मोरे (रा. कडेगाव, ता. अमरापूर, जि. सांगली) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून, चंद्रकांत तुकोबा कराडे (रा. तुळसण, ता. कराड, जि. सातारा) याने शॉकप्रूफ पाईपने त्यांच्या डोक्यात वार करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दोघेही सध्या नांगलवाडीतील शुभ लाभ सोसायटीमध्ये वास्तव्यास होते.
किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक झटापटीत होऊन अखेर प्राणघातक हल्ल्यात झाले. या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड करत आहेत.