पोलीस यंत्रणा अखेर जागी, मटका-जुगार अड्डे बंद करण्याचे आदेश
महाड – महाड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून खुलेआम सुरू असलेल्या मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, भिंगरूटसारख्या अवैध व्यवसायांविरोधात कारवाईची मागणी वारंवार होत असली तरी प्रशासन मात्र ठोस पावले उचलण्यात अपयशी ठरत होते. अखेर या निष्क्रियतेविरोधात सुभाष मोरे नामक नागरिकाने आज दुपारी महाड पोलीस ठाण्याच्या आवारात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
हे धक्कादायक कृत्य थोडक्यात टळले असले तरी त्यानंतर महाड पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी महाड शहरातील सर्व अवैध मटका आणि जुगार अड्ड्यांवर तात्काळ कारवाई करून हे धंदे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

महाड ही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांच्या कार्यामुळे ओळखली जाणारी ऐतिहासिक भूमी आहे. दरवर्षी लाखो पर्यटक आणि भीम अनुयायी येथे चवदार तळ्याला अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र, या शहरात गल्लोगल्ली मटका, पत्त्याचे डाव, ऑनलाईन लॉटरी आणि सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेले जुगाराचे व्यवहार शहराची प्रतिमा मलीन करत आहेत.
महाड शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातही मटका टपऱ्या टाकून धंदा चालवला जात असल्याची धक्कादायक बाब सुभाष मोरे यांनी उघड केली. या चौकात नव्याने पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यात आले असले तरी त्याभोवती अवैध मटका टपऱ्या खुलेआम सुरू आहेत.
सुभाष मोरे यांनी १२ तासांपूर्वी महाड पोलीस आणि नगरपालिकेला अवैध मटका, जुगार व्यवसायांविरोधात कारवाई न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, तरीही प्रशासन गप्प बसल्याने त्यांनी दुपारी १२ वाजता थेट पोलीस ठाण्याच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
या घटनेनंतर महाड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संतोष जाधव, महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर आणि सुभाष मोरे यांच्यात बैठक घेऊन शहरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या भागात हे व्यवसाय दिसतील तिथे तातडीने कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक जाधव यांनी स्पष्ट केले.
महाड औद्योगिक परिसरात काम करणारे मजूर, चालक, कामगार हे दिवसभर कष्ट करून संध्याकाळी मटका, ऑनलाईन लॉटरीत पैसे गमावत आहेत. बिरवाडीत आठ ते दहा मटका दुकाने खुलेआम सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले. हे दुकाने शाळेतील विद्यार्थ्यांच्या नजरेत येतील इतकी उघडपणे चालू आहेत.
अलीकडे काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मोजकी कारवाई केली होती, मात्र ती केवळ औपचारिक ठरली. काही दिवसांतच पुन्हा हे धंदे सुरू झाले. त्यामुळेच सुभाष मोरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि अखेर यामुळेच प्रशासनाला जाग आली आहे.
सामाजिक हितासाठी झटणाऱ्या सुभाष मोरे यांच्या धाडसी कृतीमुळे शहरातील सामान्य नागरिक त्यांचे आभार मानत आहेत. त्यांच्यामुळे शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला असून आता या धंद्यांवर कायमची गंडांतर बसणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.