वीरेश्वर महाराजांच्या भेटीसाठी हजारो भाविकांसह पदयात्रेने प्रस्थान
महाड: महाड तालुक्यातील प्रसिद्ध वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत असताना, त्यांच्या लाडक्या बहिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व ‘८४ गावांची मालकीण’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री झोलाई देवीने विन्हेरे गावातून महाडकडे प्रस्थान केले. बुधवारी दुपारी सुमारे ११ वाजता खालुबाजे व नगाऱ्यांच्या गजरात, हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही भव्य पदयात्रा उत्साहात सुरू झाली.
महाडच्या ऐतिहासिक छबिना उत्सवासाठी परिसरातील अनेक ग्रामदेवतांच्या पालख्या महाडमध्ये दाखल होत असतात. मात्र झोलाई मातेची पालखी महाडच्या छबिनाला पोहोचल्याशिवाय हा उत्सव पूर्ण होत नाही, अशी लोककथा व परंपरा आहे. यामुळेच दरवर्षी विन्हेरे गावातून हजारो भाविक सकाळपासून झोलाई मातेच्या देवस्थानात जमा होतात.
पालखीची सजावट माने यांच्या अंगणात पूर्ण झाल्यानंतर आणि पहिली ओटी माने घराण्याकडून अर्पण झाल्यावर श्री झोलाई देवी महाडच्या छबिनासाठी रवाना होते. विन्हेरे ते महाड हे सुमारे २० किलोमीटरचे अंतर लहान मुले, महिला, वृद्ध, पालखीचे मानकरी व खांदेकरी अशा असंख्य भाविकांकडून तळपत्या उन्हात पायी पार केले जाते.
पालखी मार्गस्थ झाल्यानंतर रस्त्यातील गावोगावी जल्लोषात स्वागत केले जाते. प्रत्येक गावात महिलावर्ग मोठ्या संख्येने देवीची ओटी भरण्यासाठी सहभागी होतो. तसेच झोलाई देवीची मानाची शासनकाठी फाळकेवाडी, ताम्हणे, विन्हेरे सुतार कोंड, पारदुलेवाडी, दक्षिण टोक यांसह विन्हेरे परिसरातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत भक्त खांद्यावर घेऊन २० किलोमीटर पायी प्रवास करतात. हा संपूर्ण प्रवास मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरा होतो.
दरवर्षी या यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसून येते. विन्हेरेहून प्रस्थानानंतर वाटेतील साप, रावतळी, पांगारी, अंबवडे फाटा आदी ठिकाणी महिलांकडून देवीच्या ओट्या भरल्या जातात. नागाव येथे दुपारी पदयात्रेत सहभागी भाविकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केल्यानंतर पालखी महाडच्या दिशेने पुढे निघते.
रेवताळे फाटा, करंजाडी, मांडवकर कोंड, तांबडी कोंड, आंबिवली फाटा, कुरले, गायकरवाडी मार्गे पालखी शिरगाव हद्दीत प्रवेश करते. शिरगाव फाट्यावर ग्रामपंचायत सरपंच सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांच्या हस्ते फटाक्यांच्या आतषबाजीत व पुष्पवृष्टीसह झोलाई देवीचे भव्य स्वागत करण्यात आले.
यानंतर पालखी किंजलघरमार्गे दादली येथील पाटील यांच्या निवासस्थानी भाविकांच्या ओट्या स्वीकारत पुढे जाते. रात्री सुमारे ११ वाजता पालखी महाडमधील सावित्री नदीकिनारी असलेल्या महिकावती देवी मंदिराजवळ दाखल होते. त्यानंतर रात्री सुमारे २ वाजता वीरेश्वर महाराजांच्या मंदिरात प्रवेश होतो. मंदिरात गोंधळ झाल्यानंतर महाडमधील गाडीतळ येथे काठी व पालखी नाचवण्याचा अनोखा सोहळा पार पडतो. हा दृश्य सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक उपस्थित राहतात.

