महाड – महाड एसटी आगारात अयोग्य नियोजनाखाली करण्यात आलेल्या काँक्रीटकरणाच्या कामामुळे संपूर्ण आगार परिसरात पावसाचे पाणी साचले असून, लाखो प्रवाशांना जीव मुठीत घेऊन बसमध्ये चढावं लागत आहे. या परिस्थितीसाठी विभाग नियंत्रक (पेण) व आगार प्रमुख फुलपगारे यांची दुर्लक्षवृत्ती व अपयश कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
महाड आगारामध्ये काँक्रीटकरणाचे काम एका ठेकेदारामार्फत करण्यात आले. या कामात सुरुवातीपासूनच अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे काम असल्याची तक्रार एसटी कर्मचाऱ्यांसह प्रवाशांनी वारंवार केली होती. तसेच, पावसाळ्यात आगारात पाणी साचेल याबाबतची पूर्वकल्पना प्रवाशांनी दिली होती. मात्र, या गंभीर इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत मे महिन्यातील अवकाळी पावसातच संपूर्ण आगार पाण्यात बुडाले.
कोकणातील मध्यवर्ती व महत्वाचे बस आगार म्हणून ओळख असलेल्या महाड आगारात पाण्याचे तळे तयार झाल्याने प्रवाशांना बसमधून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांनाही मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या गंभीर परिस्थितीवर आगार प्रमुख फुलपगारे यांच्याशी विचारणा करण्यात आली असता, त्यांनी हसण्यावारी नेऊन दुर्लक्ष केल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. एसटी महामंडळाकडूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही.
“महाड आगारातील कारभार ‘आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय’ अशा स्वरूपाचा आहे. सार्वजनिक पैशाचा अपव्यय आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे,” अशी तीव्र टीका प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
या परिस्थितीत ठेकेदार, संबंधित अभियंते, विभाग नियंत्रक व आगार प्रमुख यांच्यावर जबाबदारी निश्चित करून तत्काळ चौकशी व कारवाईची गरज असल्याचे नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले आहे.