मुंबई: महाराष्ट्राला देशातील सर्वात सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक लॉजिस्टिक्स हब बनवण्यासाठी परिवहन विभाग पथदर्शक भूमिका बजावेल, अशी सुस्पष्ट ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. All India Logistic Welfare Association आयोजित शिखर परिषदेत ते बोलत होते.
सरनाईक म्हणाले की, मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून आंतरराष्ट्रीय कार्गो हब म्हणूनही वेगाने विकसित होत आहे. मुंबईतून औषधे, ताजी कृषी उत्पादने, अभियांत्रिकी साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असून, जागतिक बाजारपेठेत महाराष्ट्राची उपस्थिती मजबूत झाली आहे.
मध्यपूर्व, युरोप आणि दक्षिण-पूर्व आशियातील बाजारपेठांशी राज्याला अधिक प्रभावीपणे जोडण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू असून, मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गासारख्या द्रुतगती मार्गांमुळे प्रवासाचा कालावधी कमी झाला आणि संपूर्ण राज्यातील मालवाहतुकीला वेग मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.
PM Gati Shakti मास्टर प्लॅनअंतर्गत केंद्र सरकारसोबत समन्वय साधत बंदरे, विमानतळ, रेल्वे आणि रस्ते यांच्यात सुसूत्रता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स अधिक सुलभ व परिणामकारक होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रस्ता वाहतूक ही अर्थव्यवस्थेचा कणा असून ६५ टक्क्यांहून अधिक मालवाहतूक रस्त्यांमार्फत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. All India Transporters Welfare Association आणि Bombay Goods Transport Association यांसारख्या संघटनांसोबत समन्वयाने काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक RTO सेवा ऑनलाइन व फेसलेस करण्यात आल्याने पारदर्शकता व कार्यक्षमता वाढल्याचेही त्यांनी सांगितले.
याशिवाय Messe Muenchen India आयोजित Air Cargo India आणि Transport Logistics India या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमुळे उद्योग नेते, धोरणकर्ते, जागतिक भागीदार आणि तंत्रज्ञान पुरवठादार एकत्र येत असून, सहकार्य व गुंतवणुकीला चालना मिळत आहे.
“महाराष्ट्र जलद, स्मार्ट आणि जागतिक दर्जाची लॉजिस्टिक्स व्यवस्था उभारण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे सांगत सरनाईक यांनी राज्याला देशाचे ‘लीडिंग लॉजिस्टिक्स गेटवे’ बनवण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.

