मुंबई: “२००८ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट Malegaon Bomb Blast) प्रकरणात कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्यासह सात हिंदूंना (Hindu) जाणूनबुजून अडकवून १७ वर्षे मानसिक व शारीरिक छळाचा सामना करायला लावला गेला. हे काँग्रेस सरकारचं (Congress government) ठरवून हिंदूविरोधी राजकारण होतं. आज न्यायालयीन निकालाने त्या कलंकाचा अंत झाला आहे. त्यामुळे ‘भगवा दहशतवाद’ (Saffron Terrorism) म्हणणाऱ्या काँग्रेसने हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी,” अशा खरमरीत शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.
एनआयए (NIA) विशेष न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्यानंतर शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, “सत्याचा विजय उशिरा का होईना, पण होतोच. आज त्या सातही देशभक्तांवरचा खोट्या आरोपांचा पडदा फाटला आहे.”
“या खटल्यात निर्दोष व्यक्तींना खोट्या आरोपांत अडकवण्यात आलं. पण शिवसेनेनं त्यांना सुरुवातीपासूनच निसंदिग्ध पाठिंबा दिला. कारण आम्हाला माहीत होतं की आपली बाजू ही सत्य आणि न्यायाची आहे. देशभक्त हिंदूंना ‘दहशतवादी’ ठरवण्याचा डाव यापूर्वीच उघड झाला होता,” असे शिंदे म्हणाले.
शिंदे म्हणाले, “कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्यावर झालेला अन्याय हिंदू समाज कधीच विसरणार नाही. हिंदू कधीही देशविरोधी कारवाया करू शकत नाही, कारण देशभक्ती हीच आमची धर्मनिष्ठा आहे.”
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसवर अधिक रोखठोक हल्ला चढवत सांगितलं, “‘भगवा दहशतवाद’ हा शब्द काँग्रेसच्या षड्यंत्रकारी नेत्यांनी जाणीवपूर्वक मांडला. हा एक भंपक आणि खोटा प्रचार होता. आजचा न्यायालयीन निकाल म्हणजे त्या काळ्याकुट्ट अध्यायाचा शेवट आहे. काँग्रेसने हिंदू समाजाच्या (Hindu Community) भावनांशी खेळ केला, याला आता कोणते उत्तर आहे?”
“एनआयए कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ (Garva Se Kaho Hum Hindu Hai) ही घोषणा आता देशभरात हजार पट मोठ्या आवाजात ऐकू येईल,” असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.