मुंबई :
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ मुंबईत मराठा समाज एकवटत आहे. कँडल मोर्चा, साखळी उपोषण आणि प्रवेश बंदीचा बॅनर उभारत मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी करण्यात येत आहेत. या आंदोलनाचे लोण आता मुंबईत पसरले असून पवई, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन केली जात आहेत. दरम्यान, पवईतील पंचकुटीर तसेच तिरंदाज गांवठाण या परिसरात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचे मराठा समाजाकडून फलक लावण्यात आले आहेत. त्याचवेळी १ नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे पवईतील सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. आरक्षण मागणीसाठी मुंबईत ठिकठिकाणी आंदोलनाच्या हालचाली केल्या जात आहेत. पवईतील पंचकुटीर तसेच तिरंदाज गांवठाण या परिसरात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचे बॅनर झळकविण्यात आले आहेत. जरांगे-पाटील यांच्या शांततेत आंदोलनाच्या आवाहनाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पवईतील सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आले. तसेच आंदोलनात कसे सहभागी होता येईल यावर विचार करत असल्याचे पंकज लाड यांनी सांगितले.
पवईत झालेल्या बैठकीला गजानन पवार, आनंद घोरपडे, अविनाश थोपटें, निलेश येवले, मनिष गावडे, बाळू कहडणे, संभाजी मिसाळ, विजय शिवाजी कानसकर आदी उपस्थित होते. बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण देणे लांबविण्यात येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत असून त्यावर हा जनआक्रोश उसळत असल्याचे सांगण्यात आले.
विक्रोळी सूर्य नगर येथे कँडलमार्च :
सकल मराठा समाजाकडून विक्रोळी येथील सूर्य नगर परिसरात कँडलमार्च मोर्चा काढून जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यात आला. यावेळी परिसरातील मराठा बांधव उपस्थित होते. तसेच एक मराठा लाख मराठा, आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
भाऊचा धक्का बंद :
१ नोव्हेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चा मुंबईचे समन्वयक यांच्या उपस्थित मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून भाऊचा धक्का मासळी बंदर एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय द न्यू फिश जेट्टी सी फुड डिलर असोशिएशन व भाऊचा धक्का सी फूड सप्लायर्स असोशिएशन व भाऊचा धक्का मच्छिमार कामगार संघटनांकडून घेण्यात आला. यात मराठा बांधवांनी भाऊचा धक्का येथे उपस्थित राहण्याचे आवाहन अमोल जाधवराव यांच्याकडून करण्यात आले आहे.