मुंबई – महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचा निर्णय म्हणजे संघ आणि भाजपाचा मराठी विरोधी कुटील डाव आहे. या निर्णयाचा काँग्रेस तीव्र विरोध करणार असून, “हा डाव हाणून पाडू आणि मराठीचा गळा घोटू देणार नाही,” असा इशारा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, “हिंदी भाषेचा आम्ही सन्मान करतो, पण सक्ती सहन करणार नाही. मराठी ही आमची केवळ भाषा नाही, तर ती जीवनपद्धती आहे.”
ते पुढे म्हणाले, “या निर्णयाविरोधात काही संस्था मोर्चे काढत आहेत, तर काँग्रेसकडून साहित्यिकांना पत्र लिहून आवाहन करण्यात आले आहे. हा केवळ भाषेचा नव्हे, तर संस्कृतीच्या अस्तित्वाचा लढा आहे.”
“कोणाचा फोन आला किंवा निमंत्रण दिलं का, हे महत्त्वाचं नाही. आम्ही सुरुवातीपासून या निर्णयाच्या विरोधात आहोत आणि राहणार,” असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही, मग ती महाराष्ट्रातच का? हा भाजपाचा दुटप्पीपणा असून, यावर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांनी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच संघप्रणीत ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकावरही त्यांची स्पष्ट भूमिका काय आहे हे त्यांनी सांगावे, असेही सपकाळ यांनी म्हटले.