मार्चअखेर निधी नियोजन आणि निधीवाटपाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध विकासकामांना गती दिली जात आहे. मराठवाड्यातही अनेक प्रकल्पांच्या घोषणा आणि कामांच्या पूर्ततेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असले, तरी राजकीय पातळीवर मात्र श्रेयवादाची लढाई रंगताना दिसत आहे. सत्ताधारी भाजप, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटासह काँग्रेसचे नेतेही विविध प्रकल्पांचे श्रेय घेण्याच्या स्पर्धेत उतरल्याने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नांदेडमध्ये सुमारे ४,००० कोटी रुपयांचा हवाई वाहतुकीशी संबंधित प्रकल्प उभारला जाणार असल्याची घोषणा बुधवारी विधानसभेत करण्यात आली. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासह सुमारे १,००० जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित कंपनी आणि राज्य सरकार यांच्यात या प्रकल्पासाठी सामंजस्य करार झाल्याचेही सांगण्यात आले आहे.
दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे करार झाले होते. त्यापैकी काही उद्योग मराठवाड्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी या प्रकल्पासाठी आपण पुढाकार घेतल्याचा दावा केला. मात्र अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नांदेडमधील आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या दाव्याला विरोध करत, नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगत प्रकल्पाचे श्रेय स्वतःकडे घेतले.
दरम्यान, नांदेड येथील गुरुगोविंदसिंहजी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या जुन्या वसतिगृहाच्या जागी ३०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे आधुनिक वसतिगृह उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रकल्पासाठी १७ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या मंजुरीवरून काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण आणि राज्यसभेचे भाजप खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगली आहे.
डॉ. अजित गोपछडे यांनी अर्थसंकल्पाविषयी माहिती देताना हा निधी आपल्या प्रयत्नांमुळे मंजूर झाल्याचा दावा केला, तर काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी वसतिगृहासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच निधी मंजूर झाल्याचे सांगितले. दोन्ही खासदारांनी श्रेय घेतल्याने नेमका निधी कुणाच्या प्रयत्नातून मंजूर झाला, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनीही उडी घेतली असून, या इमारत बांधकामाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर येथे नवीन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या समितीच्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, न्यायालयासाठी २५ विविध पदांच्या निर्मितीलाही प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे तुळजापूर परिसरातील न्यायदान प्रक्रियेला गती मिळणार आहे.
या न्यायालयासाठी प्रयत्न केल्याचा दावा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी केला असला, तरी तुळजापूरमधील विरोधी पक्षातील आमदारांनीही ही मागणी आपण अनेक वर्षांपासून लावून धरली होती, असे सांगत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे.
याशिवाय नांदेड-लातूर रेल्वेमार्ग उभारण्याची मागणीही गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी या रेल्वे प्रकल्पासाठी आपण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी अनेकदा चर्चा केल्याचा दावा केला आहे. मात्र स्थानिक पातळीवर हा सर्वपक्षीय प्रयत्नांचा परिणाम असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.
मराठवाड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून अनेक विकासकामांना गती मिळत असली, तरी राज्यातील सत्ताधारी आघाडीत भाजपसोबत अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटातील आमदारांचा सहभाग असल्यामुळे अनेक प्रकल्पांना तिन्ही पक्षांचा पाठिंबा मिळत असल्याचे वास्तव आहे.
तथापि, विविध प्रकल्पांचे श्रेय सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून घेतले जात असल्याने जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेकदा स्थानिक कार्यकर्तेही “हा प्रकल्प आमच्यामुळेच झाला” असा दावा करताना दिसतात. त्यामुळे मराठवाड्यातील जनता या श्रेयवादाच्या राजकीय लढाईकडे एक प्रकारच्या राजकीय विरंगुळ्याच्या नजरेने पाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
— डॉ. अभयकुमार दांडगे
मराठवाडा वार्तापत्र

