नांदेड : हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यंदाही वातावरण आनंदाचे असले, तरी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या ओला दुष्काळाच्या संकटाने हा सोहळा विषण्ण पार्श्वभूमीवर पार पडला.
गेल्या दोन दिवसांत जालना आणि बीड जिल्ह्यांत अतिवृष्टीने थैमान घातले. जालना जिल्ह्यातील सीता नदीला पूर येऊन पुलावर सहा फूट पाणी साचले. बीड जिल्ह्यात तर शेतात पाणी शिरून दगडगोटे वाहून गेले, रस्त्यावरील डांबरदेखील निघून गेले. अशा परिस्थितीत पंचनामे करणेही प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर येथे ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित होते. इतर जिल्ह्यांतही मंत्रीमंडळातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. मात्र, या सर्वांना शेतकऱ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले.
मराठवाडा अनुशेष व विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी मुंबईत लवकरच बैठक घेऊन मराठवाड्यातील प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले. दरवर्षी मराठवाड्यात किमान दोन मंत्रिमंडळ बैठका घ्याव्यात, 2016 व 2023 च्या बैठकीत जाहीर केलेल्या ९५ हजार कोटींच्या निधीची कामाविषयी स्पष्टता द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच मराठवाडा विकास मंडळाचे पुनर्जीवन करावे, अशी मागणी करण्यात आली.
बीड येथे ध्वजारोहणासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनासमोर दोन तरुणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले. नांदेडमध्ये ओबीसी कार्यकर्त्यांनी हैदराबाद गॅझेट व मनोज जरांगे यांना दिलेले आश्वासन रद्द करावे, अशी मागणी केली. या पार्श्वभूमीवर दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. धाराशिव येथेही आंदोलन पेटले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी “मराठवाडा पाणीदार करू, मराठवाड्याच्या हितासाठी निर्णय घेतले जातील” असे आश्वासन दिले. तरीही प्रत्यक्षात अतिवृष्टी, ओबीसी–मराठा आंदोलन आणि रखडलेली विकासकामे यामुळे नव्या पेचप्रसंगांना नागरिक सामोरे जात आहेत.
तरीसुद्धा मुंबईतील आगामी बैठकीत ठोस निर्णय होईल आणि मराठवाड्याचे प्रश्न मार्गी लागतील, या अपेक्षेवर नागरिक सध्या तरी समाधान मानत आहेत.