मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकांनी विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत १२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री मुंबईतील चारही चेक नाक्यांवर मोठी तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत ९८ दूध वाहने अडवून तब्बल १.८३ लाख लिटर दुधाची तपासणी करण्यात आली.
मानखुर्द चेक नाक्यावर कमी प्रतीचे दूध आढळल्याने एक वाहन परत पाठवण्यात आले. या प्रकरणी संबंधित ठिकाणी अधिक तपास करून कारवाई केली जाईल, अशी माहिती मंत्री झिरवाळ यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभर दिवसांत ठोस काम दाखवण्याच्या सूचना दिल्या आहेत, आणि त्यानुसार आमचा विभाग जबाबदारीने काम करत आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
१२ फेब्रुवारीच्या मोहिमेचा तपशील:
• मुलुंड चेक नाका – १३ वाहने
• मानखुर्द चेक नाका – ४१ वाहने
• दहिसर चेक नाका – १९ वाहने
• ऐरोली चेक नाका – २५ वाहने
• एकूण दूध साठा: १,८३,३९७ लिटर
• किंमत: ९ कोटी ६ लाख ८३२ रुपये
• नमुने तपासणी: १०६८
• सोडियम क्लोराईड आढळलेले नमुने: १०९
• साखर आढळलेला नमुना: १
झिरवाळ यांनी सांगितले की, दूध तपासणीपासून ही मोहीम सुरू झाली असून, पुढे प्रत्येक खाद्यपदार्थ तसेच घरगुती वापरातील वस्तूंची भेसळ आहे का, याचीही चौकशी केली जाईल. विभागात ५२% पदे रिक्त असल्याने लवकरच नव्या भरतीला मंजुरी दिली जाणार आहे. याशिवाय, सध्याच्या कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत लवकरच चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले.
राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ पक्षातच राहतील आणि शरद पवार हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष म्हणूनच कार्यरत राहतील, असेही झिरवाळ यांनी स्पष्ट केले.