मुंबई– राज्यात दररोज सहा शेतकरी आत्महत्या करत असताना कृषिमंत्री विधानसभेत ऑनलाईन रमी खेळत असल्याचा संताप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. “हे महाराष्ट्राची लाज वेशीवर टांगण्यासारखे आहे. मंत्र्यांना काहीच भान उरलेलं नाही. आमदार, मंत्री, पदाधिकारी सगळेच माजलेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांना वेसण घालण्याची धमक दाखवावी लागेल,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
विधानभवनात आमदार समर्थकांच्या हाणामारीवर मुख्यमंत्री म्हणाले होते, ‘आमदार माजलेत’. यावर प्रत्युत्तर देताना सपकाळ म्हणाले, “आमदारच नाहीत तर मंत्री आणि पदाधिकारीही माजलेत, हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येत नाही का? कृषिमंत्री कधी शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात, कधी कर्जमाफीच्या पैशातून लग्न करतात म्हणतात, आणि आता सभागृहात रमी खेळत बसतात.”
या घटनेच्या निषेधार्थ लातूरमध्ये छावा संघटनेने राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना पत्त्यांचा सेट देत आंदोलन केले. “हा निषेधाचा मार्ग असताना अजित पवारांच्या गुंडांनी आंदोलकांवर हल्ला केला. सत्तेची ही नशा फार काळ टिकत नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
सपकाळ यांनी सभागृहात राज्यातील काही मंत्री व अधिकारी हनीट्रॅपमध्ये अडकलेत असा गंभीर आरोप केला. मात्र मुख्यमंत्री म्हणाले, “असे काही घडलेले नाही.” यावर सपकाळ यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय मंत्र्याचा आणि हनीट्रॅप प्रकरणातील व्यक्तीचा फोटो समोर आला आहे. सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.