मुंबई – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) यंदा प्रथमच शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, मुंबई व परिसरातील पायाभूत सुविधांसाठी तब्बल ४८ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास आज मान्यता देण्यात आली. एमएमआर परिसर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी आणि भविष्यातील पाणी नियोजनासाठी विशेष भर देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत १६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल, विक्रमकुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नऊ वर्षांनंतर प्रथमच प्राधिकरणाने १७ लाख रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला असून, शिलकी अर्थसंकल्प सादर करणारी एमएमआरडीए ही देशातील महत्त्वाची संस्था असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंजूर अर्थसंकल्पातील ७५ टक्के खर्च रस्ते, मेट्रो, उड्डाणपूल, बोगदे आणि बाह्यमार्ग यांसारख्या विकासकामांवर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एमएमआर क्षेत्रातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश देताना, पाणीटंचाई दूर करण्यासाठी पोशीर आणि शिलार धरणांच्या कामांना तातडीने गती देण्याचे आदेशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
वाहतूक कोंडीवर भर
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करण्यात आली आहे. ३३७ किमी मेट्रो जाळे, पॉड टॅक्सी, बोट टॅक्सी, मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी, फ्लायओव्हर आणि अंडरग्राउंड रस्त्यांचा एकत्रित आराखडा राबवण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. मेट्रो नेटवर्कसाठी १३,८३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, मेट्रो मार्ग ४, ५, ६, २-बी आणि मार्ग १२ या प्रकल्पांना वेग देण्यात येणार आहे.
एमएमआरमधील सर्व प्रमुख महानगरपालिकांचा समन्वय साधून, नीती आयोगाच्या मदतीने ‘बृहद आराखडा’ तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले.
लास्ट माईल कनेक्टिव्हिटी
बीकेसीमध्ये पॉड टॅक्सी सेवा, तर ठाणे व मीरा-भाईंदरमध्ये बोट टॅक्सीचा प्रयोग केला जाणार आहे. मेट्रो-बस-जलवाहतूक यांची एकत्रित जोडणी करून प्रवास अधिक जलद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
डबल डेकर फ्लायओव्हर, अंडरग्राउंड टनेलिंग प्रकल्प, कोस्टल रोड आणि भिवंडी-नाशिक मार्गावरील पर्यायी रस्त्यांवर काम सुरू आहे. ट्रॅफिक ब्लॅकस्पॉट ओळखण्यासाठी स्वतंत्र अभ्यासही केला जाणार आहे. एलफिन्स्टन पुलाचे काम गणेशोत्सवापूर्वी, तर घोडबंदर रोडवरील रस्ता रुंदीकरणाचे काम महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
झोपडपट्टी पुनर्वसनाला गती
मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून रमाबाई आंबेडकर नगर येथील १७ हजार घरांचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी एसआरएकडून नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देश देण्यात आले. मुंबईत १७ तर ठाण्यात पाच इमारतींच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. रस्ते, मेट्रो आणि धरणांबरोबरच चांगली घरे देण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
मेट्रो दुर्घटनेची गंभीर दखल
मुलुंडमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकल्पांचे सुरक्षा व स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘दक्षता पथके’ नेमून दररोज नियंत्रण ठेवण्याचे व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देण्याचे आदेश देण्यात आले. हलगर्जीपणा आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही उपमुख्यमंत्र्यांनी दिला.

