मुंबई, गोरेगाव: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) गोरेगाव विधानसभा विभागाने बजाज फायनान्सच्या (Bajaj Finance) कार्यालयावर जोरदार धडक कारवाई केली. कारण, संपूर्ण कर्जहप्ता भरूनही संबंधित अधिकाऱ्याने नागरिकाशी अर्वाच्य भाषा वापरत शिवीगाळ केली आणि मनसे पक्षाबाबतही अपशब्द वापरले.
या प्रकारामुळे मनसे गोरेगाव विभाग अध्यक्ष विरेंद्र जाधव (Virendra Jadhav) यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी बजाज फायनान्सच्या कार्यालयावर धडक दिली. संबंधित अधिकाऱ्याने माफी न मागेपर्यंत कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेत संपूर्ण कामकाज बंद पाडण्यात आले.
मनसेच्या तीव्र आंदोलनामुळे बजाज फायनान्सचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला समवेत आणत मनसे पक्ष आणि राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वागणुकीबद्दल जाहीर माफी मागितली आणि भविष्यात अशी घटना पुन्हा होणार नाही, याची ग्वाही दिली.
यावेळी वनराई पोलीस ठाण्याचे अधिकारीही उपस्थित होते, ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.
यावेळी मनसे चे धनश्री नाईक – महिला विभाग अध्यक्षा, अरुण गवळी – स्थानिक शाखा अध्यक्ष, तुषार साटम – उपविभाग अध्यक्ष, नितीन खांबे, पाशु पठाण – उपविभाग सचिव, अश्विनी एतांबे, संजय खानोलकर, भूषण फडतरे – शाखा अध्यक्ष, विनीत गुप्ते – मनसे पर्यावरण राज्य उपाध्यक्ष, फ्रान्सिस लोबो – मनसे वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष, अशोक इंगोले – रस्ते आस्थापना संघटक, अनंत सूद – मनसे महानगरपालिका सेना, संतोष देशमुख, संतोष कांबळे, वैभव कदम – वाहतूक सेना आणि अक्षय भोगटे – विद्यार्थी सेना हे पदाधिकारी उपस्थित होते.
मनसेच्या धडक कारवाईनंतर बजाज फायनान्सने माफी मागत प्रकरण शांत केलं असलं, तरी अशा प्रकारांवरून ग्राहक सेवा आणि सन्मान यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मनसेने स्पष्ट केलं आहे की, अशा अपमानास्पद वागणुकी सहन केल्या जाणार नाहीत आणि गरज पडल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल.