मुंबई : विधानभवन परिसरात गुरुवारी झालेल्या हाणामारीच्या घटनेची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात घेतली. जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत आलेले अभ्यागत – नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांच्यावर विशेषाधिकार भंग (हक्कभंग) कारवाई होणार असून, या प्रकरणात फौजदारी कारवाईही करण्यात येत असल्याची माहिती अध्यक्षांनी दिली.
हे प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द करण्यात आले आहे. अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, “जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर या दोन्ही सदस्यांनी आपल्या अभ्यागतांना विधानभवनात आणले. त्यानंतर घडलेली आक्षेपार्ह घटना ही विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवणारी आहे. त्यामुळे या दोन्ही सदस्यांनी सभागृहात खेद व्यक्त करावा आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, याची हमी द्यावी.”
अध्यक्षांनी स्पष्ट केले की, “सभागृहाच्या आणि विधिमंडळाच्या परिसरात सदस्यांनी व सभागृहाबाहेरही आपल्या वर्तनामुळे सभागृहाची प्रतिमा बाधित होणार नाही, याची काळजी घ्यावी. सर्व सदस्यांनी विधिमंडळाच्या उच्च परंपरेचे पालन करणे ही घटनात्मक जबाबदारी आहे.”
आगामी अधिवेशनांमध्ये आमदारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नव्या नियमानुसार आमदार, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि अधिकृत शासकीय कर्मचाऱ्यांनाच विधानभवनात प्रवेश दिला जाईल, असेही अध्यक्षांनी जाहीर केले.
गुरुवारी मुख्य प्रवेशद्वाराजवळ झालेल्या मारहाणीच्या घटनेची चौकशी विधानभवनाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.