मुंबई : विधानभवनात गुरुवारी घडलेल्या मारामारीच्या घटनेवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “या घटनेमुळे कुणा एकट्याची प्रतिष्ठा गेली असे नाही, तर सभागृहात बसलेल्या प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मलिन झाली आहे. आज बाहेर ज्या शिव्याशापात बोलले जात आहे, ते केवळ गोपीचंद पडळकर किंवा जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांवर नाहीत, तर ‘हे आमदार माजले आहेत’ अशा शब्दांत सर्वच आमदारांवर टीका होत आहे,” असे फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
या प्रकरणावर आज विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवेदन केले. त्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभागृहात उभे राहून दिलगिरी व्यक्त केली. “अध्यक्ष महोदयांनी केलेल्या सूचनांचे मी तंतोतंत पालन करेन. १७ जुलै रोजी घडलेल्या घटनेबाबत मी खेद व्यक्त करतो, दिलगिरी मानतो,” असे पडळकर म्हणाले.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली बाजू मांडली. “नितीन देशमुख हे माझ्यासोबत विधानभवनात आले होते, मात्र सभागृहात मी एकटाच येतो. माझ्यासोबत फक्त स्वीय सहाय्यक असतो, त्यामुळे रेकॉर्डवर चुकीची नोंद जाऊ नये. घटनेच्या वेळी मी सभागृहात नव्हतो, मरीन लाईन्स येथे होतो. या घटनेशी माझा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष काहीही संबंध नाही. मी कुणाला खुणावले नाही, ना उद्युक्त केले. उलट माझ्या व्हॉट्सअॅपवर गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यात आली आणि मला मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या,” असे आव्हाड म्हणाले.
यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत, “या प्रकरणाचे गांभीर्य सर्व सदस्यांनी ओळखणे गरजेचे आहे. इतर बाबी दालनात सांगितल्या आहेत. सुरक्षा यंत्रणेकडून अहवाल मागवला आहे. या घटनेचे राजकारण होऊ नये. सभागृहाच्या भावना जपणे हे सर्वांचे कर्तव्य आहे,” असे बजावले.
या वेळी ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला असता, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “धमक्यांचा उल्लेख करण्यावर कुणीही बंदी घालू शकत नाही; पण अध्यक्षांनी जो विषय मांडला आहे, त्यावर तरी राजकारण होऊ नये. प्रतिष्ठा ही कुणा एका व्यक्तीची नसते. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करून विरोधक महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगणार? अशा घटनेचे समर्थन कधीही होऊ शकत नाही.”