मुंबई : राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याच आईच्या नावावर डान्सबार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते व आमदार अनिल परब यांनी आज विधान परिषदेत केला. त्यांनी सरकारकडे गृहराज्यमंत्री कदम यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी केली.
परब म्हणाले, “कांदिवलीत मे महिन्यात पोलिसांनी ‘सावली बार’वर छापा टाकला. २२ बारबालां, २२ ग्राहक आणि ४ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात या बारचा परवाना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती रामदास कदम यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात डान्सबार बंदी असताना हा बार कसा सुरू राहिला, याचा जाब विचारला पाहिजे.”
वाळू उपसा आणि भ्रष्टाचारावरही आरोप
रत्नागिरीत महसूल राज्यमंत्र्यांच्या कृपेमुळे अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा आरोपही परब यांनी केला. “वाळू प्रथम गरिबांना दिली पाहिजे, पण ती थेट राज्यमंत्र्यांच्या दंत महाविद्यालयात जाते. महाविद्यालय त्यांच्या बहिणीच्या नावावर असून, संचालक मंडळात खुद्द मंत्री व त्यांचे वडील आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
परब यांनी सभागृहात ड्रोन फोटोंसह दलालांची नावे आणि निवडणुकीतील छायाचित्रे दाखवत सर्व आरोप जबाबदारीने केल्याचे सांगितले. सर्व पुरावे सभापतींना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आश्वासन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना परब यांना सर्व कागदपत्रे आणि पुरावे देण्याचे सांगितले. “त्याची चौकशी केली जाईल,” असे त्यांनी आश्वस्त केले.
दरम्यान, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सर्व आरोप फेटाळले. “हे आरोप निराधार असून माझी बदनामी करण्याचा डाव आहे. योग्य वेळी मी हे पुरावे खोटे असल्याचे सिद्ध करेन,” असे कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जन सुरक्षा विधेयक, आरटीओ भ्रष्टाचारावरही परबांचा निशाणा
परब यांनी जन सुरक्षा विधेयकाच्या पार्श्वभूमीवरही सरकारवर टीका केली. “राज्यपालांच्या भेटीदरम्यान आमदारांचे खाजगी सहाय्यक खाली उतरवले जातात, मग विधिमंडळातच मारामारी होत असेल तर आमदार कसे सुरक्षित असणार?” असा सवाल त्यांनी केला.
तसेच आरटीओ अधिकारी सचिन पाटील यांच्या वाहन चालकाचा कंत्राट संपल्यानंतरही तो अधिकाऱ्यांचे कपडे घालून चलन कापत असल्याचेही परब यांनी सभागृहात सांगितले आणि त्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली.