मुंबई : गणेशोत्सवाला यंदापासून राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, महाराष्ट्र सरकार अधिकृत सहभाग घेईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. गणेशोत्सवाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, “महाराष्ट्र ही कला, संस्कृती, परंपरा, संत-सुधारक आणि भक्ती-आध्यात्म यांची समृद्ध भूमी आहे. गणेशोत्सवाने सामाजिक एकरूपता आणि सांस्कृतिक प्रगतीचा पाया घातला आहे. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेने महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक समरसतेचे मानबिंदू निर्माण केले आहेत. ही परंपरा जपत त्याला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकार सुलभकर्त्याची भूमिका बजावणार आहे.”
गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी पुढील उपक्रम राबवले जाणार आहेत: राज्यभरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होईल. महाराष्ट्राबाहेर तसेच परदेशातील मराठी भाषिक बहुल भागातही कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राच्या कला, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवले जाईल. राज्यातील प्रमुख मंदिरे आणि सार्वजनिक गणेशोत्सवांचे देखावे यांचे घरबसल्या ऑनलाइन दर्शन घेण्यासाठी विशेष पोर्टल तयार केले जाईल. तालुका स्तरावर उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांसाठी स्पर्धा घेऊन पारितोषिके दिली जातील. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो व व्हिडिओ क्लिप्स पोर्टलवर अपलोड करण्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म तयार केला जाईल. गणेशोत्सवावर आधारित चित्रपटांचा विशेष गौरव करण्यात येईल. गणपती विषयक टपाल तिकीट व नाणे काढले जाईल. राज्यभरातून गणपती विषयक रिल्स स्पर्धा घेतली जाईल व ड्रोन शोचे आयोजन करण्यात येईल. संपूर्ण देशभर माध्यमांतून गणेशोत्सवाचा प्रचार केला जाईल.
आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जातील. उत्सवाच्या काळात प्रमुख ठिकाणी विद्युत रोषणाई व सुशोभीकरण करण्यात येईल. भजन-आरती सादर करणाऱ्या भजनी मंडळांना साहित्य वाटप व अनुदान दिले जाईल. राज्यस्तरीय भजन स्पर्धा घेतली जाईल. विसर्जन सोहळ्यात आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय पर्यटकांसाठी सुविधा व वाहनव्यवस्था केली जाईल. राज्यात शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना गणेशोत्सवात सहभागी करून घेण्यासाठी विशेष योजना राबवली जाईल.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे गणेशोत्सवाला नवी ओळख मिळेल तसेच पर्यटन, कला व संस्कृतीला चालना मिळेल, असे मंत्री शेलार यांनी नमूद केले.