By: संतोष पाटील
मुंबई:“भाषेचा द्वेष नाही, पण हिंदी सक्ती कधीही होऊ देणार नाही. आधी मुख्यमंत्री यांनी नीट मराठी शिकावी, मराठी वाचायला शिकावे,” अशा कठोर शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारवर निशाणा साधला.
विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “सत्तेच्या लालसेपायी महाराष्ट्रावर काळीमा फासला गेला आहे. विधानभवनात जर गुंडगिरी होत असेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ आली आहे,” असे त्यांनी म्हटले.
ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे सादर केलेल्या रघुनाथ माशेलकर अहवालाचा उल्लेख करत, तो स्वीकारला गेला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. “मी भाषेचा द्वेष करत नाही, पण सक्तीला विरोध करतो,” असे ठामपणे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यांनी म्हटले, “मी मुख्यमंत्री असताना दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले. आज शेतकऱ्यांकडे शेती नांगरायला बैलही उरलेले नाहीत. लाडकी बहीण योजनेतही फसवणूक झाली आहे. हमीभाव नाही, कर्जमाफी नाही.”
विधानभवनात झालेल्या मारहाणीवर ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. “चड्डी बनियान गँग जर कॅन्टीनमध्ये मारहाण करत असेल तर त्यांना थेट बॉक्सिंग रिंगमध्ये उतरवा,” असा टोला त्यांनी लगावला. अध्यक्षांनी यावर उच्चस्तरीय समिती नेमली आहे, मात्र विधानभवनात गुंडगिरीचं धाडस झालं कसं? असा सवाल त्यांनी केला.
“माझं सरकार गद्दारी करून पाडलं. आज विरोधी पक्षनेत्याला बोलू दिलं जात नाही, ही लोकशाहीची थट्टा आहे,” असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.