मुंबई – पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत वातावरण चांगलेच तापले. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करत ‘चड्डी बनियन गँग’ असा उल्लेख केला, त्यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे आमदार निलेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “हिम्मत असेल तर थेट नाव घ्या,” असे खुले आव्हान दिले. त्यामुळे सभागृहाचे वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले.
आदित्य ठाकरे म्हणाले, “सध्याचे सरकार युती टिकवण्यासाठी काहीही सहन करत आहे. ‘चड्डी बनियन गँग’ राज्यात सक्रिय आहे. हे लोक कुणालाही धमकावतात, मारतात, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. तरीही मुख्यमंत्र्यांनी मोठी सहनशीलता दाखवली आहे.” या वक्तव्याच्या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टोला लगावला.
यावर प्रतिक्रिया देताना निलेश राणे म्हणाले, “जर हिंमत असेल तर आदित्य ठाकरे यांनी चड्डी कोण आणि बनियन कोण, हे स्पष्टपणे सांगावं. उगाच पब्लिसिटीसाठी आणि मीडियासाठी अशी विधाने करणं योग्य नाही. सभागृह हे जबाबदारीने बोलण्याचं स्थान आहे,” अशा शब्दांत त्यांनी आदित्य ठाकरेंना सुनावले.
आदित्य ठाकरे यांनी ‘चड्डी बनियन गँग’ असा उल्लेख करत आमदार संजय गायकवाड प्रकरणाचाही अप्रत्यक्ष संदर्भ दिला. काही दिवसांपूर्वी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप गायकवाड यांच्यावर झाला होता.
या वादामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारविरोधक आणि सत्ताधारी पुन्हा आमनेसामने आले आहेत. पुढील काही दिवस या वादाची अधिवेशनावर छाया राहील, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. ‘चड्डी बनियन गँग’ या उल्लेखामुळे राज्याच्या राजकारणात नव्या संघर्षाला तोंड फुटल्याचे मानले जात आहे.