मुंबई: विधानभवनाबाहेर शुक्रवारी सकाळपासूनच नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत सुरक्षेच्या नियमांना आव्हान दिलं.
मिटकरी यांच्या वैयक्तिक सहाय्यकाला (पी.ए.) विधानभवनात प्रवेश नाकारण्यात आला, यामुळे संतप्त झालेल्या मिटकरी यांनी प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू केले. त्यांनी ठामपणे जाहीर केलं, “जोपर्यंत माझ्या पी.ए.ला आणि मलाही सन्मानाने विधानभवनात प्रवेश दिला जात नाही, तोपर्यंत मी येथेच ठिय्या मांडून बसणार आहे.”
काल विधानभवन परिसरात घडलेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर, आजच्या दिवशी सर्व प्रवेश पास रद्द करण्यात आले होते. फक्त विशेष परवानगी असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जात होता. त्यामुळे अनेक आमदारांत नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे.
अमोल मिटकरी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आक्रमक आमदार म्हणून ओळखले जातात. सभागृहात आणि सभागृहाबाहेरही ते विरोधकांना कोंडीत पकडण्यास नेहमीच सज्ज असतात. त्यांच्या या आंदोलनामुळे विधानभवनातील सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे आणि प्रशासनाची धावपळ उडाली.
मात्र दिवसभराच्या या आंदोलनानंतरही त्यांना सभापतींकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.