Twitter : @therajkaran
मुंबई
कोविडच्या ४१५० कोटींच्या खर्चाची आकडेवारी मुंबई महानगरपालिकेकडून तपशीलवार जाहीर करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली आहे. यात सर्वाधिक खर्च हा जंबो सुविधा केंद्रावर १४६६.१३ कोटी रुपये खर्च करण्यात आला असल्याची नोंद आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (RTI activist Anil Galgali) यांनी महापालिका आयुक्त कार्यालयात अर्ज करत कोविड काळात करण्यात आलेल्या ४ हजार कोटींच्या खर्चाबाबत सादर झालेल्या अहवालाची प्रत मागितली होती. कोणत्याही विभागाने त्यांना माहिती दिली नाही. याबाबत लेखी तक्रार करताच पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (BMC commissioner I S Chahal) यांनी अनिल गलगली यांना तीन पानाची तपशीलवार माहिती दिली.
ही आकडेवारी ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंतची आहे. यात अन्नाची पाकिटे आणि अन्नधान्य यावर १२३.८८ कोटी रुपये, मध्यवर्ती खरेदी विभागाची २६३.७७ कोटी रुपये, वाहतुक विभागाने खर्च केलेले १२०.६३ कोटी रुपये, यांत्रिक आणि विद्युत विभागाने खर्च केलेले ३७६.७१ कोटी रुपये, घन आणि कचरा विभागाने ६.८५ कोटी रुपये खर्च केले आहेत. लोकप्रतिनिधी यांनी फक्त ९ लाखांचा निधी दिला आहे.
जंबो सुविधा केंद्रावर सर्वांधिक खर्च
मुंबईतील १३ जंबो सुविधा केंद्रावर (Jumbo covid Centre) १४६६.१३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यानंतर मुंबईतील २४ वॉर्ड आणि सेव्हन हिल रुग्णालयाने १२४५.२५ कोटी रुपये खर्च केला आहे. कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयाने २३३.१० कोटी रुपये खर्च केले आहेत. मुंबईतील पाच प्रमुख रुग्णालयाने १९७.०७ कोटी रुपये, सहा विशेष रुग्णालयाने २५.२३ कोटी रुपये, १७ पेरिफेरल रुग्णालयाने ८९.७० कोटी आणि नायर रुग्णालयाने १.४८ कोटी खर्च केले आहेत. मात्र, ही आकडेवारी जरी स्पष्ट असली तरी कोविड (covid pandemic) काळातील सर्व प्रकारच्या खर्चावर श्वेत पत्रिका काढली जाणे आवश्यक आहे, जेणेकरून अजून सुस्पष्टता येईल, असे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले.