मुंबई/दिल्ली – मुंबई ही केवळ मराठी माणसांचीच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांचीही आहे. येथे कोणताही भाषिक किंवा प्रांतीय वाद नाही, मात्र काँग्रेस मराठी अस्मितेसोबत खंबीरपणे उभी आहे, असे स्पष्ट मत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केले.
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या मराठी विरोधी वक्तव्याचा निषेध केला. राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीत प्रवेशाबाबत विचारले असता, “अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत ७५ लाखांहून अधिक वाढीव मतदानाची चौकशी व्हावी, अशी मागणी करत चेन्नीथला म्हणाले की, “निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे. बिहारमध्येही २ कोटी मतदारांचा घोळ झाला आहे. आम्ही या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहोत.”
त्यांनी निवडणुकांमध्ये पारदर्शकतेची मागणी करत, आयोगाच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केला.