मुंबई: महामुंबई मेट्रोच्या मॅनेजिंग डायरेक्टर IAS रुबल अग्रवाल यांच्या पुढाकारातून विकसित झालेले ‘मुंबई वन’ (Mumbai One App) हे डिजिटल ॲप मुंबईकरांसाठी नवे आकर्षण ठरले आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा एका क्लिकवर आणणाऱ्या या अॅपला केवळ तीन ते साडेतीन दिवसांत दीड लाखांहून अधिक डाउनलोड्स मिळाले असून, हे अॅप ‘सुपरफास्ट हिट’ ठरत आहे.
या अॅपमुळे मुंबईतील मेट्रो, लोकल ट्रेन, बेस्ट बस आणि इतर महानगरपालिका बससेवा या सर्व सुविधा एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नुकतेच या अॅपचे लाँचिंग करण्यात आले असून, पहिल्याच आठ तासांत ३५ हजार मुंबईकरांनी हे ॲप डाउनलोड केले. आता केवळ काही दिवसांतच हे आकडे दीड लाखांच्या पुढे गेले आहेत.
’मुंबई वन’ – सार्वजनिक वाहतूक सेवेला डिजिटल बूस्ट
‘मुंबई वन’ अॅपद्वारे मुंबई आणि उपनगरांतील नागरिकांना ऑनलाइन तिकीट बुकिंग, डिजिटल पेमेंट, आणि रिअल टाइम ट्रान्सपोर्ट माहिती उपलब्ध झाली आहे. मेट्रो प्रवाशांसाठी ई-तिकीटिंग, लोकल ट्रेन आणि बेस्ट बस तिकीट बुकिंग, एकाच QR कोडने विविध वाहतूक सेवांचा वापर
या अॅपमुळे प्रवाशांचा वेळ वाचत असून, विनातिकिट प्रवासाला आळा बसणार आहे. महसुलात वाढ आणि प्रवासी सोयीमुळे मुंबई मेट्रोलाही दुहेरी फायदा मिळत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रुबल अग्रवाल यांचे नेतृत्व आणि दृष्टी
राज्याच्या वरिष्ठ प्रशासकीय सेवेत IAS अधिकारी रुबल अग्रवाल यांनी पूर्वी ज्या पदांवर काम केले, तिथे निर्णयक्षमतेने आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात त्या नेहमी पुढे राहिल्या आहेत. ‘मुंबई वन’ हे त्यांच्या नेतृत्वाखाली विकसित झालेले इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट अॅप असून, हे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेतील डिजिटल क्रांतीचे पाऊल ठरत आहे.
एमएमआरडीए हद्दीतील वाहतूक कोंडी आणि वाढती वाहनसंख्या लक्षात घेऊन हे अॅप सार्वजनिक वाहतूक सेवेला नवे तंत्रज्ञानाधारित बळ देणार आहे.
’मुंबई वन’ अॅपचे वैशिष्ट्ये
• एकाच ॲपमधून मेट्रो, लोकल आणि बससेवांचे तिकीट बुकिंग
• डिजिटल पेमेंट आणि QR कोड स्कॅनिंग
• रिअल टाइम ट्रॅकिंग आणि रूट माहिती
• ‘वायफाय’ सुविधा – अॅप सहज वापरण्यासाठी
• महसूल वाढ आणि प्रवासी सोयींचा समतोल
महामुंबई मेट्रोच्या अंदाजानुसार, पुढील एका वर्षात ५० लाख मुंबईकर या अॅपचा वापर करतील.
’मुंबई वन’ने घडवली डिजिटल मुंबईकडे झेप
सार्वजनिक वाहतूक प्रणालीचे डिजिटायझेशन हे मुंबईच्या ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने मोठे पाऊल मानले जात आहे. रुबल अग्रवाल यांच्या पुढाकारामुळे मेट्रोचे जाळेच नव्हे तर मुंबईकरांचा प्रवासही आता ‘एकाच अॅपवर, एका क्लिकमध्ये’ अधिक सोपा आणि स्मार्ट झाला आहे.