मुंबई – राज्य सरकारचे सुमारे ३ कोटी ८२ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडवून नियमबाह्य नोंदणी केल्याप्रकरणी मुंबई ३१ येथील सह-दुय्यम निबंधक ईश्वर डी. देवशी यांना निलंबित करण्यात आले असल्याची घोषणा महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांनी बुधवारी विधानसभेत केली.
आमदार रत्नाकर गुट्टे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. प्राथमिक तपासात जुहू येथील एका मिळकतीच्या नोंदणी प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले आहे.
बावनकुळे म्हणाले की, संबंधित अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून मुद्रांक शुल्काची योग्य वसुली न करता चुकीच्या पद्धतीने नोंदणी केली. त्यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडाला आहे. या प्रकरणात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून ती तीन महिन्यांत पूर्ण केली जाईल.
“निलंबन ही केवळ प्राथमिक प्रक्रिया आहे. चौकशीत दोष सिद्ध झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला. तसेच या प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१०० कोटींच्या मालमत्तेवरही लक्ष
या प्रकरणाशी संबंधित मालमत्तेची बाजारमूल्य सुमारे १०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. बुडालेला महसूल वसूल करण्यासोबतच संबंधित मालमत्ता शासनजमा करण्याच्या दृष्टीनेही प्रशासनाने कार्यवाही सुरू केली असल्याचे महसूलमंत्र्यांनी नमूद केले.
“शासनाचा एकही रुपया वाया जाऊ दिला जाणार नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी या प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याचा पुनरुच्चार केला.

