ताज्या बातम्या महाराष्ट्र

Budget Session: नागपूरमध्ये सुरक्षा व सीसीटीव्ही यंत्रणेसाठी तातडीने निधी द्या : प्रवीण दटके

मुंबई: उपराजधानी नागपूर येथेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असून या परिसरात सातत्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा असते. त्यामुळे या भागात सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि सीसीटीव्ही यंत्रणेचे जाळे उभारण्यासाठी तातडीने निधी मंजूर करावा, अशी आग्रही मागणी सत्तारूढ पक्षाचे सदस्य Pravin Datke यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभाग घेताना केली.

सन २०२५–२६ च्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेचा आज पहिला दिवस होता. यावेळी दटके यांनी पूर्व विदर्भातील ग्रामीण भागात अभ्यासिका व वाचनालयांची कमतरता असल्याकडे लक्ष वेधले. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, उत्तम दर्जाच्या अभ्यासिका व ग्रंथालयांसाठी पुरेसा निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

दटके यांनी नागपूरमधील १९०६ सालापासून कार्यरत असलेल्या क्षयरोग (टीबी) तपासणी व उपचार केंद्राचा मुद्दाही उपस्थित केला. या केंद्रात सध्या स्क्रिनिंग व आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव आहे. विदर्भातील सहा जिल्ह्यांत, नागपूरसह, सुमारे चार लाख टीबी रुग्ण आढळून आले आहेत. लवकरात लवकर यासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही, तर विदर्भ ‘टीबीची राजधानी’ बनेल, असा इशाराही त्यांनी दिला.

शिवभोजनसाठी निधी द्या : नितीन राऊत

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य Nitin Raut यांनी शिवभोजन योजनेसह विविध कल्याणकारी योजनांसाठी निधी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. संजय गांधी निराधार योजनेसह अनेक योजनांना निधी उपलब्ध नाही. यापूर्वी ८०–८० हजार कोटींच्या पुरवणी मागण्या करण्यात आल्या, तर आता ११ हजार कोटी रुपयांच्या मागण्या केल्या जात आहेत. याचा अर्थ राज्याकडे निधीची टंचाई आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राऊत यांनी सांगितले की, गेल्या दहा महिन्यांपासून शिवभोजन योजनेला निधी मिळालेला नाही. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या माध्यान्ह भोजन योजनेची स्थितीही चिंताजनक असून निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याच्या तक्रारी आहेत. मराठी शाळा बंद पडत असताना मराठी भाषा गौरव दिन कसा साजरा करायचा, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात