मुंबई : राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा मुख्य आधार असलेल्या आरोग्य परिचारिकांचे आझाद मैदान येथे सुरू असलेल्या धरणे व बेमुदत काम बंद आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)ने जाहीर पाठिंबा दिला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन परिचारिकांच्या मागण्यांना समर्थन दिले.
शशिकांत शिंदे म्हणाले, “परिचारिका भगिनींच्या न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ठामपणे त्यांच्या सोबत आहे. हा लढा केवळ त्यांच्या हक्कांसाठी नाही तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी आहे. त्यामुळे सरकारने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा.”
परिचारिकांच्या प्रमुख मागण्या : अधिपरिचारिका, परिसेविका, पाठयनिर्देशिका या पदांवरील वेतन त्रुटी दूर करणे, कंत्राटी भरती रद्द करून १००% कायमस्वरूपी पदभरती करणे, पदोन्नतीद्वारे भरावयाची ५०% हून अधिक रिक्त पदे तत्काळ भरणे, मागील ४० वर्षांपासून प्रलंबित असलेले भत्ते मंजूर करणे.
या मागण्यांसाठी परिचारिका गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. राज्य सरकारने तात्काळ तोडगा काढावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला.