मुंबई : उपनगरातील, विशेषतः ठाणे जिल्ह्यातील होतकरू क्रिकेटपटूंसाठी उभं राहिलेलं महत्त्वाचं व्यासपीठ — नवी मुंबई प्रीमियर लीग (NMPL) — आता गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेचे माजी पदाधिकारी शाहआलम शेख यांनी या स्पर्धेत मोठ्या गैरप्रकारांचा आरोप केला आहे. मॅच फिक्सिंगपासून खेळाडू आणि प्रशिक्षकांचे मानधन बुडवण्यापर्यंतच्या तक्रारींनी वादाचे रूप घेतले असून, खेळाडू, प्रशिक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी मुंबई क्रिकेट संघटना (MCA) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांच्याकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
आयपीएलच्या धर्तीवर आखलेल्या या स्पर्धेचा उद्देश स्थानिक क्रिकेटपटूंना आर्थिक लाभ मिळवून देणे होता. आठ संघांमध्ये रंगणारी ही लीग, लाखों रुपयांच्या बक्षिसांसह खेळाडूंना श्रेणीप्रमाणे मानधन देण्याच्या दाव्यामुळे चर्चेत आली होती. मात्र, तीन वर्षे उलटूनही अनेक खेळाडूंना वचन दिलेले मानधन मिळालेले नाही, असा आरोप सहभागी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षकांनी केला आहे.
स्पर्धेतील लिलाव प्रक्रियेत खेळाडूंना “अ, ब, क, ड” अशा श्रेणींमध्ये विभागले जाते, आणि ठराविक रकमेवर त्यांची निवड केली जाते. मात्र, मिळणाऱ्या रकमेतील कर वजा करून देण्यात यायचा मोबदला अनेकांना मिळालाच नाही.
याशिवाय, सामना निश्चिती (match-fixing) प्रकरणांचाही आरोप समोर आला आहे. काही वेळा पोलिसांनी मैदानाबाहेरून बुकिजना अटक केल्याचे खेळाडूंचे म्हणणे आहे. आयोजकांना या प्रकारांची माहिती असूनही त्यांनी राजकीय संबंध वापरून बाब दडवून ठेवल्याचा आरोपही होत आहे.
तीन वर्षांच्या अनुभवावर आधारित या लीगला आता शेअर बाजारात उतरवण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत आहेत. मात्र, तसे झाल्यास आतापर्यंतचे गैरप्रकार अधिक गडद होतील, अशी भीती क्रिकेट वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

