मुंबई: महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिल्यानंतर, मुंबई महानगरपालिकेनेही उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या पाठपुराव्याला यश मिळत, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ऑनलाईन मंडप परवानगी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अनिल गलगली यांनी ४ जुलै २०२५ रोजी पालिकेचे उप आयुक्त प्रशांत सपकाळे यांना पत्र लिहून विनंती केली होती की, गणेशोत्सव मंडळांसाठी एक खिडकी योजना अंतर्गत संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात यावी. मंडळांना वेळेत परवानग्या मिळाव्यात आणि उत्सवाच्या तयारीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी ही मागणी होती.
उप आयुक्त सपकाळे यांनी या सूचनेची तात्काळ दखल घेत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे मुंबई व उपनगरांतील मंडळांना मंडप उभारणी, मूर्ती स्थापना, सजावट व इतर संबंधित परवानग्या मिळवणे आता अधिक सुलभ, पारदर्शक व वेगवान होणार आहे.
अनिल गलगली यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले, “मुंबईत दरवर्षी हजारो सार्वजनिक गणेश मंडळे उत्सव साजरा करतात. मात्र परवानगी प्रक्रियेमुळे अनेक वेळा विलंब व अडचणी निर्माण होतात. ऑनलाईन प्रणालीमुळे ही प्रक्रिया सुसूत्र होईल व मंडळांना नियोजन वेळेत करता येईल.”
राज्य शासन व महापालिकेच्या या संयुक्त निर्णयामुळे यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव अधिक सुस्थित, नियोजित आणि सुरक्षित वातावरणात पार पडेल, असा विश्वास विविध मंडळांकडून व्यक्त केला जात आहे.