माजी आमदार नरेंद्र पवार यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी
कल्याण: कश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे या अतिरेकी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघा जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी अतुल मोने हे मध्य रेल्वेमध्ये कामाला होते. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मोने यांच्या पत्नीला नोकरी देण्यासह त्यांच्या कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत करण्याची मागणी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. या संदर्भात पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री यांची आज भेट घेत आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.
मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 28 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर सह संपूर्ण देशभरामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अतिरेक्यांनी पर्यटकांना आपापला धर्म विचारून त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसमोरच गोळ्या झाडण्यात आल्या. हे अत्यंत मानवी कृत्य असून याचा करावा तितका निषेध कमीच असल्याची भावना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली आहे. या अतिरेकी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यातील एक अतुल मोने मध्य रेल्वेच्या परळ वर्क शॉपमध्ये कामाला होते.
मोने यांच्या निधनाने त्यांच्या परिवारावर मोठी शोककळा पसरली असून त्यांच्या घरचा आधारवडच हरपला आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने आपली सामाजिक बांधिलकी जपून अतुल मोने यांच्या पत्नीला नोकरीत समाविष्ट करून घ्यावे. आणि त्यांच्या परिवाराला भरघोस आर्थिक मदत करण्याची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
दरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या दोन्ही मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत त्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्याचेही नरेंद्र पवार यांनी सांगितले आहे.