X: @therajkaran
अफगाणिस्तानच्या खोस्त आणि पाकटीका या प्रांतांमध्ये 18 मार्चला हवाई हल्ले करून पाकिस्तानने एकच खळबळ उडवून दिली. पाकिस्तानच्या उत्तर वजिरीस्तान भागात दहशतवादी हल्ला झाला. त्यात सात सैनिक ठार झाले. या हल्ल्याचा बदला म्हणून हे हवाई हल्ले करण्यात आले असा दावा पाकिस्तानने केला. या हवाई हल्ल्यात आठ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र, हा हल्ला तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडण्यासाठी केला होता, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.
हल्ला आणि प्रतिहल्ला एवढ्या पुरताच ही घटना मर्यादित नाही. त्याकडे पाकिस्तानचे तालिबानशी बिघडत चाललेले संदर्भ या दृष्टिकोनातूनदेखील बघायला हवे. तालिबाने ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानची सत्ता पुन्हा हस्तगत केली त्यावेळी सर्वाधिक आनंद पाकिस्तानला झाला होता. अफगाणिस्तानची गुलामगिरीतून मुक्तता झाली आहे असे उद्गार पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यावेळी काढले होते.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची सीमा रेषा ही मात्र गेल्या अडीच वर्षांपासून धुमसत आहे. दोन्ही देशांमधील संघर्षाला या सीमारेषेवरूनच सुरुवात झाली आहे. या सीमेवर सध्या कमालीची अशांतता आहे.
तालिबानचा 1990 च्या दशकात उदय झाला. पाकिस्तानने तालिबानला सढळ हस्ते मदत केली होती. तालिबान सरकारला मान्यता देणारे तीन देश होते. त्यात पाकिस्तानदेखील होता. दहशतवाद्यांनी 11 सप्टेंबर 2001 ला न्यूयॉर्कचे वर्ल्ड ट्रेड सेंटर उदध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानला तालिबान विरोधात उघडपणे भूमिका घावी लागली. एका बाजूने दहशतवादाविरोधात आम्ही अमेरिकेसोबत आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. मात्र, त्याच सुमारास तालिबानच्या सर्वच प्रमुख नेत्यांना पाकिस्तानने बलुचिस्तानमधील क्वेट्टा येथे आश्रय दिला होता.
अफगाणिस्तानमधील सरकारला भारताचा पाठिंबा होता. पाकिस्तानने मात्र या सरकारच्या विरोधात तालिबानला मदत केली. तालिबानच्या मदतीने दक्षिण आशियामध्ये आपले वर्चस्व निर्माण करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. तालिबान सत्तेत आल्यानंतर आपला हा प्रयत्न यशस्वी होईल, असे पाकिस्तानला वाटले. मात्र, झाले उलटेच. तालिबान पाकिस्तानला हिंग लावून विचारत नाही. त्यामुळे पाकिस्तान खवळला आहे.
तालिबान आणि टीटीपी हे एकाच आईचे मुलगे असल्याप्रमाणे वावरतात. सुन्नी वर्चस्व निर्माण व्हावे, असा त्यांचा प्रयत्न आहे. तालिबानने अफगाणिस्तानात जसे वर्चस्व निर्माण केले आहे तसेच वर्चस्व टीटीपीला पाकिस्तानात निर्माण करायचे आहे. त्यामुळे टीटीपीच्या विरोधात पाकिस्तानने कितीही आगपाखड केली, तरी तालिबान टीटीपीला मदत करणे थांबवणार नाही.
पाकिस्तानने कायमच इस्लामी दहशतवाद्यांना रसद पुरवठा केला आहे. तालिबान पाकिस्तानच्या हातचे बाहुले बनण्यास तयार नाही. आपल्यावरच खेळ उलटला असल्याची जाणीव पाकिस्तानला आहे. त्यातून पाकिस्तान आता सौदी अरेबियाला जवळ करून पाहत आहे. त्याचा हा प्रयत्न यशस्वी होतो किंवा नाही हे काळच ठरवेल.