मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर चांगले काम करत असल्याचे सांगत भाजप आमदार चित्रा वाघ यांनी आरोग्य व्यवस्थेतील काही गंभीर त्रुटींवर विधान परिषदेत लक्ष वेधले. डॉक्टरांची कमतरता, अनुभव नसलेल्या डॉक्टरांची नियुक्ती तसेच पालघर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची अपुरी स्थिती याबाबत त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
वाघ म्हणाल्या की, राज्याची आरोग्य व्यवस्था हळूहळू सुधारण्याच्या मार्गावर आहे, ही सकारात्मक बाब असली तरी अजूनही अनेक ठिकाणी डॉक्टरांची कमतरता आहे. काही ठिकाणी अत्यल्प अनुभव असलेल्या डॉक्टरांना महत्त्वाच्या पदांवर नेमले जात असल्याने आरोग्य व्यवस्थेत गंभीर समस्या निर्माण होत आहेत.
सीनियर मेडिकल ऑफिसर या पदासाठी साधारणतः किमान १५ वर्षांचा अनुभव अपेक्षित असतो. मात्र काही ठिकाणी केवळ तीन ते सहा महिन्यांचा अनुभव असलेले डॉक्टर महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मासवण आणि आशागड या ठिकाणी डॉक्टरांच्या अभावामुळे कर्मचाऱ्यांकडून प्रसूती करून घेण्याच्या घटना घडल्या आहेत. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी स्पष्टपणे दाखवते, असे त्यांनी नमूद केले.
याशिवाय पालघर जिल्ह्यातील डहाणू उपजिल्हा रुग्णालयातील परिस्थितीवरही त्यांनी लक्ष वेधले. रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. बारिक यांनी चांगले काम केले असले तरी त्यांना झालेल्या हेड इंज्युरीमुळे रुग्णांशी संवाद साधताना अडचणी येत आहेत. तसेच रुग्णालयातील एमएसजीआय डॉ. हिंगणे यांची मोठी ब्रेन सर्जरी झाल्याने त्यांच्या आरोग्याबद्दलही चिंता व्यक्त केली.
पालघर जिल्हा मोठा असल्याने दूरवरून रुग्ण उपचारासाठी येतात. अशा वेळी डॉक्टरांची कमतरता किंवा संवादात अडथळे निर्माण झाल्यास रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते, असे त्यांनी सांगितले.
डहाणू उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन गेल्या एक वर्षापासून बंद असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. सध्या तीन महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात रेडिओलॉजिस्ट म्हणून डॉ. सूर्यकांत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र रुग्णालयात रेडिओलॉजिस्टची अधिकृत पदसंख्या मंजूर नसल्याने भविष्यात रुग्णांना मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात.
म्हणूनच त्या ठिकाणी रेडिओलॉजिस्टची अधिकृत पोस्ट मंजूर करावी किंवा व्यवस्था होईपर्यंत डॉ. सूर्यकांत यांची सेवा सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वाघ यांनी केली.
राज्यातील नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारने तातडीने योग्य निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

