X : @Rav2Sachin
मुंबई : वर्षाभरापूर्वी अग्निशामक पदाच्या भरती प्रक्रियेतील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची शैक्षणिक पात्रते सोबत ते अग्निशमन दलाच्या मैदानी परिक्षेत आणि शारीरीक चाचणीत उत्तीर्ण झालेले असूनही त्यांची नियुक्ती रिक्त जागांवर न करता आता नव्याने 550 अग्नीशामक पदाची भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
वर्षाभरापूर्वी अग्नीशामक या संवर्गातील 910 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. अग्नीशामकाच्या 910 रिक्त पदांपैकी 37 पदे ही दिव्यांगकरीता आरक्षित होते. मात्र दिव्यांग आरक्षण लागू होणार नाही, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याने 910 जागा मधून दिव्यांग पदाच्या 37 जागा वगळून 873 उमेदवारांची गुणवत्तेनुसार भरती प्रक्रियेत निवड यादी करण्यात आलेली होती.
Rajkaran.com चे आमचे पत्रकार सचिन उन्हाळेकर यांनी अग्निशामक भरती (recruitment) संदर्भातील माहिती, माहितीच्या अधिकाराखाली मिळाली.
अग्नीशामकपदी आतापर्यंत एकूण 733 उमेदवारांची नियुक्ती झालेली आहे, असे माहितीच्या अधिकाराखाली (RTI) माहिती मिळाली. जर 873 उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड यादी करण्यात आली होती, आणि 733 उमेदवारांची अग्नीशामक पदी नियुक्ती झाली तर उर्वरित 140 अग्नीशामक पदाच्या जागा आजही रिक्त असल्याचे समोर आले आहे.
तसेच तत्कालीन आयुक्त यांच्या मंजुरी अन्वये अग्नीशामक पदाच्या एकूण रिक्त पदांच्या 30 टक्के प्रवर्ग निहाय एकूण 277 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आलेली असताना अग्नीशामक पदाच्या 140 रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती अद्याप करण्यात आलेली नाही.
प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची शैक्षणिक आणि शारिरीक क्षमता असून ते सर्वजण मैदानी परिक्षेत उत्तीर्ण झालेले असताना अग्नीशामक पदाच्या 140 रिक्त जागांवर त्यांची नियुक्ती का केली जात नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहे.
अग्नीशामक पदाच्या रिक्त जागा या प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना घेऊन भरल्या जाऊ शकतात, अशी वारंवार मागणी उमेदवारांकडून केली जात आहे. ‘आम्ही सर्वजण मैदानी परिक्षेत उत्तीर्ण आहोत. आमची शैक्षिणक पात्रता आहे. आम्ही शारीरिक चाचणीत ही उत्तीर्ण आहोत. असे असूनही आमची नियुक्ती रिक्त जागांवर न करता आम्हाला डावलून आता नव्याने भरती प्रक्रिया राबविली जात आहे. आमचा कोणताही विचार प्रशासन करत नसल्याची खंत असे प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी व्यक्त केली आहे.
अग्नीशामक पदाच्या रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी, असे आदेश तत्कालिन आयुक्तांनी दिले होते. या आदेशाचे पालन सहा महिन्यात करण्यात न आल्याने ही प्रतिक्षा यादी रद्द झाल्याचे सांगितले जाते. मग तत्कालीन आयुक्तांचे आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल उमेदवारांनी उपस्थित केला आहे.
अग्निशामक भरती प्रक्रियेतील १४० रिक्त जागा आजही असताना या रिक्त जागा भरण्यासाठी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना का घेतले जात नाही, असा प्रश्न उपस्थित करत आम्हाला आमच्या हक्काच्या नोकरी पासून डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, यासंबंधी कोणत्याही प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे.