By Gulab Bhavsar
बीड: बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या परिस्थितीला कारणीभूत ठरवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसपी अविनाश बारगळ यांची तातडीने बदली केली आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी जिल्ह्यात रुजू झालेल्या बारगळ यांच्या उचलबांगडीचे नेमके कारण काय, याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे. खोट्या गुन्ह्यांची नोंद, खंडणी, खून, वाळू माफियांचे प्रस्थ आणि राजकीय हस्तक्षेप या सगळ्या मुद्द्यांनी त्यांच्या बदलीला वळण दिल्याचे बोलले जात आहे.
कडक धोरणांचा अभाव:
ऑगस्ट 2024 मध्ये बीड जिल्ह्यात एसपी म्हणून रुजू झालेले अविनाश बारगळ हे शांत, शिस्तप्रिय आणि सक्षम अधिकारी म्हणून ओळखले जात. मात्र, जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेला ताळ्यावर आणण्यात ते अपयशी ठरल्याचे चित्र उभे राहिले. पवनचक्की कंपन्यांना धमक्या, वाढती गुन्हेगारी, वाळू माफियांचे बळ, गुटखा माफियांचे वाढते प्रभाव आणि खुनाच्या घटनांवर ठोस कारवाई करण्यात अपयश हे त्यांच्यावरील टीकेचे प्रमुख मुद्दे ठरले.
खोट्या गुन्ह्यांची नोंद आणि राजकीय हस्तक्षेप:
रामकृष्ण बांगर, सत्यभामा बांगर आणि बाळा बांगर यांच्या कुटुंबावर, तसेच डॉ. देशमुख यांच्यावर खोट्या गुन्ह्यांची नोंद केल्याचे आरोप बारगळ यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांवर झाले. बांगर कुटुंब घरी असताना, आणि त्यांचा मुलगा राज्याबाहेर असताना, कोणाच्या तरी राजकीय दबावाखाली गुन्हे दाखल झाल्याचा आरोप करण्यात आला.
गुन्हे दाखल करण्यास विलंब:
मस्साजोग खून प्रकरणात बारगळ यांच्या यंत्रणेने गुन्हे दाखल करण्यास उशीर केल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली. तसेच, जिल्ह्याचा पोलीस दल परळीतून वाल्मिक कराड चालवत असल्याचा आरोप वारंवार होत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने चर्चा सुरू:
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सगळ्या मुद्द्यांचा आढावा घेत बारगळ यांची बदली केली. चार महिन्यांमध्येच जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यात अपयशी ठरल्यामुळे एका चांगल्या अधिकाऱ्याची प्रतिमा गडबडली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बारगळ यांच्या नंतर, बीड जिल्ह्यातील इतर पोलीस अधिकारी, विशेषतः परळीतून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.