मुंबई – मुंबईला ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न देणाऱ्या कामगारांच्या चेहऱ्यावर या दिवाळीत आनंदाची लहर आली आहे. ‘आरबीजी फाउंडेशन’च्या चेअरमन मधुरा राहुल गेठे यांच्या पुढाकारातून ‘प्रकाशभेटी’ या उपक्रमाद्वारे शहराच्या विकासात झटणाऱ्या महिला व पुरुष कामगारांना दिवाळीच्या भेटवस्तू देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मेट्रो, मोनोरेल, उड्डाणपूल, रस्ते, गगनचुंबी इमारती अशा मुंबईच्या विकासकामांत रात्रंदिवस घाम गाळणारे कामगार दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहतात. त्यांच्या मेहनतीशिवाय मुंबईचा विकासच अपूर्ण आहे. या श्रमिकांचा उत्सव ‘गोड’ आणि ‘प्रकाशमय’ करण्याच्या भावनेतून आरबीजी फाउंडेशनने शंभरहून अधिक कामगार कुटुंबांना साड्या, ड्रेस, मिठाई आणि भेटवस्तूंचे वाटप केले.
”माहेरची साडी” – महिला कामगारांसाठी खास भेट
कामगारांच्या महिलांना “माहेरची साडी” देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला. झोपड्यांमध्ये राहणाऱ्या, लेकरांना पदराआड झोपवून काम करणाऱ्या या महिलांच्या घरीही दिवाळीचा गोडवा पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता.
या उपक्रमामुळे मुंबई स्मार्ट करणाऱ्या हातांना ‘प्रकाशभेट’ मिळाली असे म्हणावे लागेल.
मधुरा गेठेंचे सामाजिक योगदान
नवी मुंबईतील ‘आरबीजी फाउंडेशन’च्या चेअरमन म्हणून मधुरा राहुल गेठे शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि महिलांच्या सक्षमीकरणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. राज्यातील गरजू मुलींच्या शिक्षणासाठी त्यांचा पुढाकार विशेष उल्लेखनीय आहे. समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या आयुष्यात उजेड आणणे हे त्यांचे ध्येय आहे.
मधुरा गेठेंचे मत: “आपण मुंबईत राहतो, पण तिच्या उभारणीत झटणारे हात दुर्लक्षित राहू नयेत. या प्रत्येकाच्या घरात दिवाळीचा सुगंध आणि आनंद पोहोचावा, या भावनेने आम्ही कामगारांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांच्याही घरात दिवे पेटले, हीच आमच्यासाठी खरी दिवाळी आहे.” — मधुरा राहुल गेठे, चेअरमन, आरबीजी फाउंडेशन, नवी मुंबई