मुंबई – यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा देत परिवहन मंत्री आणि एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एकेरी गट आरक्षणावर लावण्यात आलेली ३० टक्के भाडेवाढ रद्द करण्याची घोषणा गुरुवारी केली. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार व मुंबईतील चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेऊन घेण्यात आला आहे.
सरनाईक म्हणाले, “गणपती उत्सव, मुंबईचे चाकरमानी आणि एसटी यांचे नाते अतूट आहे. कोकणातील प्रवाशांचा एसटीवर अपार विश्वास आहे. त्यामुळे आर्थिक तोटा सहन करूनही एसटीने नेहमीच चाकरमान्यांना सेवा दिली आहे आणि देत राहील.”
तथापि, एसटी महामंडळ सध्या आर्थिक संकटात असून सणासुदीच्या काळात खासगी बस कंपन्या प्रचंड भाडेवाढ करतात. त्याच्या तुलनेत एसटीचे दर तुलनात्मकदृष्ट्या कमी आहेत. भविष्यात परिस्थिती लक्षात घेऊन जर काही प्रमाणात दरवाढ झाली, तर प्रवाशांनी त्याला समजून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मागील वर्षी गणपतीसाठी एसटीने ४,३३० बसेस पुढील प्रवासासाठी आणि १,१०४ बसेस परतीसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र एकेरी आरक्षणामुळे कोकणात प्रवासी उतरवून रिकाम्या बसेस परत पाठवाव्या लागल्या, तसेच परतीच्या प्रवासासाठी नव्याने रिकाम्या बसेस कोकणात पाठवाव्या लागल्या. यामुळे इंधन, कर्मचारी वेतन, ओव्हरटाईम भत्ता आदी खर्चामुळे एसटी महामंडळाला एकट्या गणेशोत्सव काळात ११.६८ कोटींचा तोटा सहन करावा लागला.
तरीही यंदा गणेशोत्सवासाठी ५,००० बसेस सोडण्याचे नियोजन आहे. या बसेस पुन्हा एकेरी गट आरक्षणासाठी वापरण्यात आल्यास हा तोटा १३ ते १६ कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाजही सरनाईक यांनी व्यक्त केला.
तरीही चाकरमान्यांच्या सेवेसाठी भाडेवाढ रद्द करत असल्याने, एसटीचा सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन अधोरेखित झाला आहे.