पाकिस्तान डायरी

दहा टक्क्यांचे राष्ट्रपती

X: @therajkaran

पाकिस्तानच्या राष्ट्रपतिपदी अपेक्षेप्रमाणे आसिफ अली झरदारी (Pakistan’s President Asif Ali Zardari) यांची निवड झाली आहे. या पदासाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत त्यांनी मेहमूद खान अचाजकी यांचा दणदणीत पराभव केला. झरदारी यांना 411, तर अचाजकी यांना 181 मते मिळाली.

आसिफ अली सरदारी राष्ट्रपती होतील हे भाकित जगात सर्वप्रथम The News 21 ने सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल आल्यानंतर लगेचच वर्तवले होते. शहाबाज शरीफ पंतप्रधान (Prime Minister Shehbaz Sharif) होतील हेदेखील भाकित आम्हीच वर्तवले होते. ही दोन्ही भाकिते आज तंतोतंत खरी ठरली आहेत.

सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्रिशंकू नॅशनल असेम्ब्ली (Hung Parliament) अस्तित्वात आल्यामुळे पाकिस्तानात राजकीय पेच निर्माण झाला होता. हा पेच दूर करण्यासाठी पाकिस्तान मुस्लिम लीग (Pakistan Muslim League -Nawaz) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (Pakistan People’s Party – PPP) एकत्र आले. त्यांच्यात झालेल्या समझोत्यानुसारच शरीफ आणि झरदारी यांची महत्त्वाच्या पदांवर निवड झाली आहे.

पाकिस्तानात लोकशाहीचे कसे धिंडवडे निघाले आहेत हे समजून घ्यायचे असेल तर झरदारी यांच्या निवडीकडे पाहावे लागेल. पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून गेल्या 75 वर्षांत केवळ चार राष्ट्रपती लोकशाही मार्गाने निवडून आले आणि त्यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. इतर वेळी पाकिस्तानची सत्ता ही लष्करप्रमुखांच्या ताब्यात होती. दुसऱ्यांदा राष्ट्रपती म्हणून निवडून येणारे झरदारी हे पहिलेच नेते ठरले आहेत.

pakistani diary

पाकिस्तानच्या इतर कोणत्याही नेत्यासारखीच झरदारी यांची कारकीर्ददेखील वादग्रस्त ठरली आहे. सख्ख्या मेव्हण्याच्या हत्येच्या आरोपावरून त्यांना चार वर्षांचा तुरुंगवासदेखील झाला होता. भ्रष्टाचार (corruption) आणि अकार्यक्षमतेचे आरोप त्यांच्यावर नेहमीच होत राहिले आहेत.

सिंध प्रांतातील श्रीमंत बलुच कुटुंबात (Baloch family) 1955 मध्ये झरदारी यांचा जन्म झाला. पण ते खऱ्या अर्थाने चर्चेत आले ते बेनझीर भुट्टो (Benazir Bhutto) यांच्याशी 1987 मध्ये विवाह केल्यानंतरच बेनझीर यांना त्यांच्या वडिलांकडून राजकीय वारसा मिळाला होता. पुढे त्या पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. बेनझीर यांच्या पंतप्रधानाच्या कार्यकाळात झरदारी यांचेही नशीब फळफळले. बेनझीर यांच्या दोन्ही मंत्रिमंडळात झरदारी मंत्री होते. एकदा पर्यावरण खात्याचे, तर दुसऱ्यांदा गुंतवणूक खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले.

एका उद्योगपतीच्या पायाला बॉम्ब बांधून त्याला बळजबरीने बँकेतून पैसे काढायला भाग पाडल्या प्रकरणी 1990 मध्ये झरदारी यांना अटक झाली होती. त्यांना तीन वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांच्यावरील आरोप मात्र कधीच सिद्ध झाला नाही. त्यानंतर अवघ्या सहा वर्षांतच बेनझीर भुट्टो यांचे सरकार बरखास्त झाल्यानंतर झरदारी पुन्हा एकदा चर्चेत आले. सख्खा मेव्हणा मूर्तझा भुट्टो याची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यांची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी झाली. ते तब्बल आठ वर्षे तुरुंगात राहिले. ते 2004 मध्ये जामीनावर बाहेर आले आणि पुढील चार वर्षांत त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली.

नियतीचा खेळ अतिशय विचित्र असतो. बेनझीर यांची 2007 मध्ये हत्या झाली तेव्हा झरदारी राजकारणापासून अलिप्त होते. पुढील वर्षी पाकिस्तान पीपल्स पार्टीने सार्वत्रिक निवडणुकीत यश मिळवले आणि पुन्हा एकदा झरदारी यांचे नशीब उघडले. त्यांची थेट राष्ट्रपती म्हणून निवड झाली. तब्बल 11 वर्षे तुरुंगात काढलेले झरदारी पाकिस्तानचे घटनात्मक प्रमुख बनले.
झरदारी यांची राष्ट्रपतिपदाची पहिली कारकीर्द वादग्रस्तच होती. बेनझीर यांचे मंत्री म्हणून काम करत असताना त्यांना ‘मिस्टर 10 टक्के’ असे म्हणून हिणवण्यात येत असे. कोणत्याही कामात दहा टक्के दलाली (ten per cent commission) घेतल्याशिवाय ते काम करायचेच नाही अशी त्यांची कार्यशैली होती. पहिल्यांदा राष्ट्रपती झाल्यानंतरही या कार्यशैलीत फारसा फरक पडला नाही. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेच. राष्ट्रपतिपदावरून पायउतार झाल्यानंतर भ्रष्टाचार प्रकरणी त्यांना सहा महिने तुरुंगवासदेखील झाला. नाही म्हणायला त्यांच्या हातून एक चांगले काम घडले. महिलांवर ॲसिड हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची तरतूद त्यांनी केली.

पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती होत. आता दुसऱ्यांदा ही संधी मिळाल्यानंतर ते आपला कार्यकाळ पूर्ण करतात का, भ्रष्टाचारापासून अलिप्त राहतात का, पंतप्रधानांशी जुळवून घेतात का आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानी जनतेच्या मनात लोकशाहीबद्दल विश्वास निर्माण करू शकतात का, हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

Also Read: आर्थिक संकटाच्या गर्तेत

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

ताज्या बातम्या पाकिस्तान डायरी

इम्रान खान, गोपनीय कागद आणि शह – काटशह

X: @therajkaran इम्रान खान पाकिस्तानचे सर्वोत्तम क्रिकेटपटू होते. वेगवान गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती. नव्या चेंडूबरोबरच ते
पाकिस्तान डायरी

ते परत आले आहेत

X: @therajkaran नवाज शरीफ हे पाकिस्तानच्या राजकारणातील बडे प्रस्थ आहेत. तीन वेळा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी त्यांना मिळाली आणि तिन्ही