विधानपरिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांच्या लक्षवेधी सूचनेनंतर महत्त्वाची बैठक
मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराचे आमिष दाखवून बोगस ॲपच्या माध्यमातून होणारी फसवणूक ही अत्यंत गंभीर बाब असून, अशा तक्रारींची तातडीने दखल घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले आहेत.
विधान भवन, मुंबई येथे आज सभापती प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विधानपरिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी पावसाळी अधिवेशन-2025 मध्ये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेचा आढावा घेण्यात आला.
सभापती प्रा. शिंदे यांनी निर्देश दिले की, “बोगस ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. येत्या 15 दिवसांत अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात विशेष बैठक घेऊन ठोस उपाययोजना आखावी.”
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे चिन्ह (Logo) वापरून बनावट ॲप तयार केले जातात. या ॲपद्वारे बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळले जातात. काही दिवसांत फसवणुकीचे लक्षात आल्यानंतर तक्रार करण्यासाठी गेलेल्या तरुणांना पोलिस ठाण्यात ताटकळत ठेवले जाते, अनेकदा तक्रार दाखलही केली जात नाही, असे गंभीर मुद्दे ॲड. निरंजन डावखरे यांनी बैठकीत मांडले.
त्यांनी याकडे लक्ष वेधले की, “अशा प्रकारच्या ॲप फसवणुकीमागे काही पोलिस कर्मचाऱ्यांचे संगनमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी.”
या बैठकीस गृह विभागाचे सहसचिव राहुल कुलकर्णी, पोलीस उपआयुक्त बजरंग बनसोडे, आणि सायबर विभागाचे प्रविण बनगोसावी उपस्थित होते. तथापि, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ आणि इतर वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित राहिल्याबद्दल सभापती प्रा. शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सभापतींनी स्पष्ट केले की, “राज्यातील तरुणांची फसवणूक थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. गृह विभागाने या संदर्भात तातडीने पावले उचलावीत.”

