पिढ्यानपिढ्या गड जपणाऱ्या कुटुंबांसाठी ऐतिहासिक आणि भावनिक क्षण
महाड: इतिहासाची साक्ष देणाऱ्या पवित्र किल्ले रायगडावर आज एक भावनिक आणि समाधानाचा क्षण अनुभवायला मिळाला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे तसेच गडाच्या संरक्षणाची जबाबदारी पिढ्यानपिढ्या पार पाडणाऱ्या २५ कुटुंबांच्या घरांमध्ये अखेर उजेड पोहोचला. सौरऊर्जेवर आधारित दिव्यांच्या माध्यमातून ही घरे आज प्रकाशमान झाली.
किल्ले रायगडाच्या अस्तित्वापासून गडावर वास्तव्यास असलेल्या या कुटुंबांचे ऐतिहासिक वारशाच्या जतन व संरक्षणातील योगदान अमूल्य आहे. त्यांच्या घरांमध्ये प्रकाश पोहोचणे म्हणजे स्वराज्याच्या इतिहासाशी निष्ठेने जोडलेल्या या सेवेला दिलेला एक छोटासा पण अर्थपूर्ण सन्मान मानला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर सीएसआर निधीच्या माध्यमातून साकारलेल्या या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा संजय कुलकर्णी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या Filtgard Filters Private Limited आणि MyRide Energy Private Limited या संस्थांचे यावेळी मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
उन्हा, पाऊस, थंडी आणि वाऱ्याला तोंड देत वर्षानुवर्षे किल्ले रायगडावर राहणाऱ्या या कुटुंबांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला. रायगडाचा इतिहास, स्वराज्याची प्रेरणा आणि समाजसेवेची भावना यांचा संगम साधणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.

