मुंबई : विधानभवनाच्या आवारात काल सत्ताधारी पक्षाचे आमदार समर्थक आणि विरोधकांच्या कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी झाली. या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज थेट सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत.
“ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडतोय – काय अवस्था झाली आहे आपल्या महाराष्ट्राची?” असा सवाल करत राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांची खिल्ली उडवली आहे.
“सत्ता ही साधन असते, साध्य नव्हे. पण सध्या वाट्टेल त्या लोकांना पक्षात घेऊन, त्यांच्या हातून विरोधकांवर गलिच्छ शेरेबाजी करवून पुन्हा साधनशुचिता वगैरेच्या बडबडी करणं – हा भंपकपणा आता तरी जनतेच्या लक्षात यायला हवा.”
राज ठाकरे यांनी सूचक शब्दांत विचारलं – “कोणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र?”
ते पुढे म्हणाले, “मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला, तर आमच्यावर तुटून पडणारे आज कुठे आहेत? आम्ही जर दणका दिला, तर तो व्यक्तिगत नाही, तो आमच्या भाषेसाठी असतो. माझ्या दिवंगत आमदाराने देखील विधानभवनात असाच दणका दिला होता – कारण मराठी माणसाला कमी लेखलं जात होतं.”
राज ठाकरे यांनी विधानभवनाच्या खर्चावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “एक दिवसाचं अधिवेशन चालवायला दीड ते दोन कोटी रुपये खर्च होतो. हे पैसे काय तुमच्या गलिच्छ शेरेबाजीसाठी आहेत का? राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत, विकासकामं रखडली आहेत, कंत्राटदारांचे पैसे थकलेत, जिल्ह्यांना निधी मिळत नाहीये – आणि इकडे सत्ताधारी आमदार आणि मंत्रीच अधिवेशनाला फार्स म्हणतायत!”
“जर हेच सुरू राहिलं, तर उद्या विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही!” – राज ठाकरे यांचा इशारा.
“माध्यमांना विनंती आहे – या उथळ भंपक प्रकरणात अडकू नका. आणि सरकारला थेट आव्हान आहे – जर साधनशुचिता असेल, तर तुमच्या लोकांवर कारवाई करून दाखवा. नसेल तर सांगा, मग आम्हीही आमचे हात उघडे ठेवू. पण तेव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका.”