मुंबई – राज्यातील सत्ताधाऱ्यांचा दुटप्पी आणि भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Minister Pratap Sarnaik) यांनी रॅपिडो कंपनीविरोधात (Rapido Bike Taxis) कारवाईचा मोठा गाजावाजा केला होता. ॲपवरून बाईक सेवा देणाऱ्या या कंपनीविरोधात फिल्मी स्टाईलमध्ये स्वतः सरनाईक यांनी रस्त्यावर उतरून कारवाई केल्याचा दावा केला होता.
मात्र, फार काळ लोटण्याआधीच या कारवाईमागील ढोंगीपणा उघड झाला. ज्याच्यावर कारवाई केली तीच रॅपिडो कंपनी आता प्रताप सरनाईक यांच्या मुलाच्या प्रो गोविंदा स्पर्धेचा प्रमुख प्रायोजक (Rapido sponsorer of Pro-Govinda) म्हणून समोर आली आहे.
हा प्रकार म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे (NCP Sharad Pawar faction) मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी केली आहे. त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “सरकारची ही ढोंगी नैतिकता आणि नैतिक दिवाळखोरीचा कळस आहे. सामान्य जनतेसाठी कायद्याचा धाक दाखवायचा आणि आपल्या कौटुंबिक कार्यक्रमांसाठी त्याच कंपन्यांची मदत घ्यायची – हीच भाजप सरकारची (BJP government) डबल स्टँडर्ड राजवट आहे.”
अॅड. मातेले (Adv Amol Matele) यांनी सवाल केला आहे की, जर रॅपिडो ही कंपनी बेकायदेशीर आहे, तर तिचं प्रायोजकत्व स्वीकारण्यामागे नक्की काय अर्थ लपला आहे? कायद्याची तंबी जनतेसाठी वेगळी आणि मंत्र्यांच्या कुटुंबीयांसाठी वेगळी का? एका हातात कारवाईची तलवार आणि दुसऱ्या हातात ‘डील’ साइन करण्याचं पेन, असा थेट आरोप त्यांनी केला.
या प्रकरणाची तातडीने चौकशी व्हावी, अशी मागणी करताना अॅड. मातेले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट खुलं आव्हान दिलं आहे – “जर पारदर्शकता आणि नैतिकता शिल्लक असेल, तर या प्रकाराची चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करा.”