मुंबई– मुंबई मराठी पत्रकार संघ आणि इंटरन्यूजच्या ‘अर्थ जर्नलिझम नेटवर्क’ (EJN) यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान नूतनीकरणीय ऊर्जेवरील राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी तामिळनाडू, महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशातील पत्रकार व संवादकांना प्राधान्य दिले जाणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ सप्टेंबर २०२५ रात्री १२ वाजेपर्यंत आहे.
भारताने नुकताच १०० गिगावॅट सौर ऊर्जा उत्पादन क्षमतेचा टप्पा पार केला असून जुलै अखेरीस एकूण ११९ गिगावॅट सौर, ५२ गिगावॅट पवन आणि १० गिगावॅट जैवइंधन आधारित ऊर्जा निर्मिती केली आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या कार्यशाळेत ऊर्जा संक्रमणातील यश, आव्हाने आणि पुढील दिशा यावर सखोल चर्चासत्रे होणार आहेत.
या तीन दिवसीय कार्यशाळेत निवड झालेल्या पत्रकारांना संशोधक, उद्योग तज्ज्ञ व धोरणकर्त्यांकडून थेट मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्पांना भेटीची संधी मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांच्या प्रवास, निवास आणि भोजनाची सोय आयोजकांकडून केली जाणार आहे.
पात्रता व अटी:
– कार्यशाळेचे सर्व दिवस उपस्थित राहणे आवश्यक.
– विज्ञान, पर्यावरण, ऊर्जा वा उद्योग विषयांवर अहवाल सादर केल्याचा अनुभव असावा.
– इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
– नूतनीकरणीय ऊर्जा विषयातील रुची अनिवार्य.
– दोन कामांचे नमुने किंवा लिंक्स जोडणे आवश्यक.
– वरिष्ठ अथवा पर्यवेक्षक यांची संमतीपत्र आवश्यक.
महिला, दलित, आदिवासी, अपंगत्व असलेले तसेच करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील पत्रकारांना विशेष प्रोत्साहन दिले जाईल.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने ‘apply now’ बटनावर क्लिक करून करता येईल. कोणतीही अडचण आल्यास info.ejn@internews.org या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अंतिम मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.