जम्मू-काश्मीर (श्रीनगर) : पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पर्यटकांचा जीव वाचवताना प्राण गमावलेल्या घोडेवाला सय्यद आदिल हुसैन शाह यांच्या कुटुंबियांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
या भेटीत त्यांनी हल्ल्यानंतर दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल शिंदे यांचे आभार मानले. हल्ल्यावेळी आदिलने दहशतवाद्यांना रोखण्याचा आणि काही पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दहशतवाद्यांनी त्यालाही गोळ्या घालून ठार केले. या धाडसाची देशभरात प्रशंसा झाली होती.
घडलेल्या घटनेनंतर शिंदे यांनी आपल्या अधिकाऱ्यांमार्फत व पक्ष पदाधिकाऱ्यांमार्फत कुटुंबाला पाच लाखांची मदत दिली होती. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, “आपण एक मुलगा गमावला, त्यापुढे ही मदत अत्यल्प आहे. मात्र देशवासीयांच्या वतीने ही कृतज्ञतेची भावना आहे.”
शिंदे यांनी आश्वासन दिले की, शिवसेना पक्ष कायम त्यांच्या पाठीशी राहील आणि लागेल ती मदत केली जाईल. तसेच काश्मीरमध्ये पुन्हा पर्यटन फुलवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन येथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारणार असून, त्यामुळे हॉटेल व्यवसायिक, घोडेवाले, टुरिस्ट गाईड आणि दुकानदार यांना रोजगाराचे नवे अवसर मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या भेटीत आदिलचे आई-वडील, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.