मुंबई – राज्यात मागील चार वर्षांत गोवंश हत्या, विक्री व वाहतूक प्रकरणी तब्बल २८४९ गुन्हे दाखल झाले असून ४६७८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये एकूण १७२४ टन गोमांस जप्त करण्यात आले असल्याची माहिती गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हैदराबादहून मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडे निर्यातीसाठी निघालेल्या दोन कंटेनर ट्रकवर कारवाई करण्यात आली. या ट्रक मधून तब्बल ५७ हजार किलो गोमांस जप्त करण्यात आले. मे. एशियन फुड मीम अॅग्रो कंपनीकडून या गोमांसाची निर्यात होत असल्याची माहिती भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात दिली. त्यांनी गोहत्येबंदी कायद्याच्या कडक अंमलबजावणीसह दोषींवर गुन्हे दाखल करून परवाने रद्द करण्याची मागणी केली. तसेच गोतस्करी रोखण्यासाठी स्वतंत्र कठोर कायदा करावा, अशी सूचनाही त्यांनी मांडली.
या मागणीला उत्तर देताना मंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, एशियन फुड मीम अॅग्रो कंपनीच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येईल. या प्रकरणात संघटित गुन्हेगारीचा संबंध आढळल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गतही कारवाई केली जाईल.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर २५ मार्च २०२५ रोजी अडवण्यात आलेल्या कंटेनर ट्रकमधून जप्त केलेले ५७ हजार किलो गोमांस गुजरातमार्गे अरब देशात विक्रीसाठी नेले जात होते. या प्रकरणात एशियन फुड मीम अॅग्रो कंपनीच्या मालक व इतरांनी बनावट ई-वे बिल व अन्य कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले असून त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गोमांस विक्री, वाहतूक व हत्या यावर बंदी घालणारा कायदा अधिक कडक करण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे असले तरी राज्य सरकारकडून दोषींवर कठोर कारवाई केली जात असल्याचेही मंत्री भोयर यांनी स्पष्ट केले. गोमांस वाहतूक पूर्णतः थांबवण्यासाठी शासन प्रयत्नशील असून संबंधित प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत केला जाईल, असे ठोस आश्वासनही त्यांनी सभागृहाला दिले.