मुंबई – के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स, एस.के. सोमय्या विनय मंदिर हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, तसेच के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् ॲण्ड कॉमर्स येथे बनावट गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचे दाखले सादर करून इयत्ता ११वीसाठी अनधिकृत प्रवेश मिळविल्याप्रकरणी १० आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
तारांकित प्रश्न विचारणारे आमदार सुनील प्रभू यांना उत्तर देताना मंत्री भोयर यांनी सांगितले की, टिळक नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५१ विद्यार्थ्यांना बनावट गुणपत्रिका देण्यात आल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी २ लिपिकांना निलंबित करण्यात आले आहे.
मंत्री भोयर यांनी स्पष्ट केले की, राज्यातील इतर महाविद्यालयांतही असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आल्यास, तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.