जळगाव: सेऊल, दक्षिण कोरिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र परिषदेत भालोद येथील सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी सहभाग घेतला.
“दक्षिण आशियातील राजकीय ध्रुवीकरण : सध्याच्या परिस्थितीत भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशचे तुलनात्मक विश्लेषण” या विषयावर त्यांनी आपला शोधनिबंध सादर केला.
या परिषदेत विविध देशांतील तज्ज्ञांनी प्रा. नेवे यांच्या शोधनिबंधाचे कौतुक केले. ब्राझीलच्या डॉ. कारला डी पैवा यांनी विशेष उल्लेख करत, “प्रा. नेवे यांचे विश्लेषण आणि मांडणी दक्षिण आशियातील राजकीय समतोल साधण्यासाठी मार्गदर्शक ठरेल,” असे मत व्यक्त केले.

प्रा. नेवे यांनी आपल्या शोधनिबंधातून पुढील मुद्द्यांवर प्रकाश टाकला:
• भारत, पाकिस्तान व बांगलादेश या तिन्ही देशांमध्ये राजकीय ध्रुवीकरणाची समस्या आहे.
• भारताच्या संदर्भात धार्मिक, जातीय व प्रादेशिक तणाव, पाकिस्तानात धार्मिक अतिरेकीपणा व बांगलादेशात लष्करी राजवट यामुळे ध्रुवीकरण वाढले आहे.
• यावर उपाय म्हणून संवाद, लोकशाही संस्था बळकट करणे व प्रादेशिक सहकार्याची गरज आहे.
प्रा. नेवे यांनी आवाहन केले, “आपण एकत्र येऊन जागतिक कल्याणासाठी काम करूया. राष्ट्र, धर्म, पंथ, वंश यांच्या पलिकडे जाऊन मानवतेसाठी एकत्र काम करणे हीच खरी गरज आहे.”
भालोदच्या सेकंडरी एज्युकेशन सोसायटी व महाविद्यालयाने प्रा. डॉ. सुनील नेवे यांचे अभिनंदन केले आहे.