मुंबई : विधीमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या गोंधळाच्या वेळी प्रसंगावधान राखून वेळीच हस्तक्षेप करणाऱ्या सुरक्षारक्षकांची विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी विशेष प्रशंसा केली. सभापतींनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारल्याने सुरक्षा विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिवेशन संपण्याच्या दोन दिवस आधी विधानभवनाच्या लॉबीच्या बाहेरच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झटपट झाली होती. या ‘फ्री स्टाईल’ झटापटीत वातावरण तणावपूर्ण बनले असताना सुरक्षारक्षकांनी दाखवलेल्या दक्षतेमुळे मोठा अनुचित प्रकार टळला.
या घटनेवेळी सुरक्षा विभागातील मार्शल उमेश पवार, मुबारक पठाण, सचिन पाटणे आणि गोडसे यांनी अत्यंत तत्परतेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने दोन्ही गटांना वेगळे केले. त्यांनी ना फक्त गोंधळ नियंत्रणात आणला, तर परिसरातील शांतताही राखली आणि विधिमंडळाच्या प्रतिष्ठेचे रक्षण केले.
या उल्लेखनीय कार्याबद्दल सभापती प्रा. राम शिंदे यांनी सुरक्षा रक्षकांना वैयक्तिकरित्या शाबासकी दिली. “विधानभवन हे लोकशाहीचे मंदिर आहे. येथे कोणत्याही असभ्य किंवा असंविधानिक वर्तनाला स्थान नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
सभापतींच्या या शाबासकीमुळे सुरक्षारक्षकांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह संचारला आहे. मुंबई पोलिस दलातून नियुक्त होणाऱ्या या सुरक्षारक्षकांना ‘मार्शल’ म्हणून ओळखले जाते. विधिमंडळातील शिस्त आणि सुरक्षिततेच्या रक्षणासाठी ते नेहमी तत्पर असतात. या घटनेनंतर विधानभवनातील सुरक्षा व्यवस्थेची पुनर्तपासणी आणि बळकटीकरणाची मागणीही पुढे येत आहे.
विधानभवनातील सुरक्षा कर्मचारी केवळ शारीरिक बळाने नव्हे, तर विवेकाने व जबाबदारीने कार्य करत असून, राजकीय आणि सामाजिक समन्वय राखण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.